जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित ‘अल अदील’ समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ‘मसाला किंग’ डॉ. धनंजय दातार नवउद्योजकांना व्यवसाय मार्गदर्शन करणार आहेत. जीवनाच्या संघर्षपूर्ण प्रवासातून अनेक अडथळे पार करत व्यवसायात गरूडभरारी घेणा-या आणि मराठी उद्योजकतेचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावणा-या डॉ. दातारांशी संवाद साधण्याची संधी कल्याण व भिवंडीतील नवउद्योजकांना, तसेच उद्यमशील तरुणाईला मिळणार आहे. या दोन्ही मार्गदर्शन कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे. कल्याणमधील कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने या डॉ. दातार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना मिती क्रिएशन्सची आहे.
भिवंडीमधील कार्यक्रमात सौ. श्वेता गानू या डॉ. दातार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. आपल्या या अनुभवाची शिदोरी महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवून त्याचा फायदा व्यवसायात येणा-या नवउद्योजकांना व्हावा, या हेतूने धनंजय दातार आता कल्याण आणि भिवंडीतील होतकरू उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. व्यवसाय लहान आहे, की मोठा, असा विचार न करता वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि परिणामकारक सेवा या त्रिसूत्रीच्या जोरावर ग्राहकांचे समाधान केल्यास नक्कीच यश मिळते, यावर डॉ. दातारांचा भर आहे.
व्यवसाय आणि व्यापार या क्षेत्रांमध्ये कित्येक मराठी व्यापा-यांनी स्वत:चे असे यशस्वी स्थान तयार केले असून ते आज इतर महाराष्ट्रीय लोकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत. पण वाढती स्पर्धा आणि कठोर आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही ज्यांनी यशस्वी कामगिरीत सातत्य राखले आहे, अशांनी इतरांना प्रेरित करणे ही काळाची गरज आहे. शिवाय मराठी युवा पिढीत व्यापाराचे हे चैतन्य निर्माण करणेही गरजेचे आहे. म्हणूनच भारतातील एक यशस्वी मराठी उद्योजक ज्यांनी जगाच्या नकाशावर आपली नाममुद्रा उमटवली आहे असे डॉ. धनंजय दातार यांचे अमूल्य मार्गदर्शन नवीन उद्योजकांना लाभदायक ठरणार आहे. त्याचा लाभ सर्व उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
>> दिनांक : १४ एप्रिल शनिवार, स्थळ : बॉलरूम प्लाज्झो, मेट्रो जंक्शन मॉल, कल्याण (पूर्व), वेळ : सकाळी १० वाजता.
>> दिनांक : १५ एप्रिल रविवार, स्थळ : व्हाईट हाऊस हॉल, गोकुळनगर, भिवंडी, वेळ : सायंकाळी ५ वाजता.