भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना रामेश्वरम या त्यांच्या मूळ गावी अंत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.
रामेश्वरम -जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखल्या जाणा-या माजी राष्ट्रपती व देशाचे ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना गुरुवारी अखेरचा निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या माजी राष्ट्रपतींचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटला होता.
राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांसह सर्वसामान्य जनता लाखोंच्या संख्येने उपस्थित होती. कलाम यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. कलाम यांना अखेरचा निरोप देताना हजारो नागरिकांना अश्रू आवरत नव्हते.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कलाम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. रामेश्वरमच्या सुपुत्राला निरोप देण्यासाठी मोठय़ा संख्येने लोक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथील पेकारुम्बू भागातील दीड एकरच्या परिसरातील मध्यभागी कलाम यांच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला. कलाम यांचे ९९ वर्षाचे बंधू दूरवरून हा अंत्यविधी पाहत होते. मौलवी एस. एम. अब्दुल रेहमान यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. तत्पूर्वी कलाम यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांनी मशिदीत नेले. तेथे विशेष नमाज अदा केल्यानंतर दफनविधी झाला.
पंतप्रधान मोदी यांनी कलाम यांचे मोठे बंधू मोहम्मद मुथू मीरन लेब्बई मराईकर यांचे सांत्वन केले. त्यांना अश्रू आवरत नव्हते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही कलाम यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. या अंत्यविधीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. नौदल, तटरक्षक दल व मरिन पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले होते. कलाम यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी घरांच्या छप्पर व झाडांवर नागरिक उभे होते. कलाम यांच्या अंत्यविधीसाठी तामिळनाडूतील दुकाने, व्यावसायिक आस्थापने, रेस्टॉरंट बंद ठेवली होती.
कलाम यांच्या अंत्यविधीसाठी पेरिकाम्बू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तामिळनाडूचे राज्यपाल के. रौसेह, एम. वेंकय्या नायडू, तामिळनाडूचे अर्थमंत्री ओ.पन्नीरसेल्वम, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी पुष्पचक्र अर्पण करून कलाम यांना आदरांजली वाहिली. तर पíरकर, नायडू यांनीही आदरांजली वाहिली. तसेच तिन्ही दलांकडून कलाम यांना मानवंदना देण्यात आली.
कलाम यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंजाब, बंगाल आदी भागातून लोक आले होते. डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी आलेल्या हजारो नागरिकांसाठी रामकृष्ठ मठ, स्थानिक रोटरी क्लबने भोजन व पाण्याची व्यवस्था केली होती.
तामिळनाडू बंद
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून तामिळनाडूतील जनतेने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवला. कोइम्बतूर, तिरुपूर, निलग्रीस जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल, व्यापारी आस्थापने बंद होती. कोइम्बतूर व परिसरातील शहरांमध्ये औषधांची दुकानेही बंद होती. चित्रपटगृहातील चित्रपटांचे खेळ बंद होते. राज्य सरकारने सुट्टी जाहीर केल्यानंतरही उटी, गुडालूर, कुन्नूर या लोकप्रिय पर्यटनस्थळावरही शुकशुकाट दिसत होता. तामिळनाडूच्या विविध शहरात विद्यार्थ्यांनी मेणबत्ती पेटवून कलाम यांच्यासाठी प्रार्थना केल्या. तसेच त्यांचे छायाचित्र लावून त्यांना फुले वाहून आदरांजली वाहिली.