‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत, जवळपास वर्षभरापूर्वी सुरू झालेली ‘माझ्या नव-याची बायको’ या झी टीव्हीवरील मालिकेने दोन वर्षाचा प्रवास पूर्ण केला.
रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: राज्य करणा-या या मालिकेने ‘टीआरपी’चे नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. आपल्या नव-यावर मनापासून प्रेम करणारी ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नव-याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया तसेच राधिका-शनायाच्या कचाटय़ात सापडलेला गुरुनाथ, या तिघांची अफलातून ‘केमिस्ट्री’ हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे.
‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर मालिकेच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त विशेष ‘पोस्ट’ शेअर केली आहे. मालिकेतील कलाकार ‘ऑफस्क्रीन’ देखील तितकीच धमाल करतात. दुस-या वर्षपूर्तीचा आनंद केक कापून साजरा केला. गुरुनाथ, रेवती आणि गुप्ते यांचे म्युझिकली व्हीडिओ चाहते तितकेच आवडीने बघत आहेत.
राधिकाने एएलएफ कंपनीला ‘टेकओव्हर’ करून कंपनीची सर्व सूत्र स्वत:च्या हातात घेतल्याचे सध्या मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे. गुरुनाथ आणि शनाया त्याच कंपनीत काम करत असून राधिका त्यांना चांगलेच धारेवर धरत आहे. गुरुनाथ आणि शनाया यांना राधिका तिच्या तालावर कसे नाचवणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.