दसरा- दिवाळीच्या दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे.
मुंबई- दसरा- दिवाळीच्या दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे. घराचे स्वप्न पाहणा-या मुंबईकरांसाठी ही खूशखबर असून मुंबई मंडळासाठी सुमारे १००० घरांसाठी ही लॉटरी असल्याची माहिती मेहता यांनी दिली.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीची सोडत आज सकाळी जाहीर करण्यात आली. म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात सकाळी १० वाजता मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी म्हाडाच्या कोकण विभागाच्या लॉटरीसाठी कमी ऑनलाईन अर्ज आले हे मान्य करतो. मात्र यावेळी लोकांचा प्रतिसाद का कमी मिळाला, याविषयी मी स्वतः माहिती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.