मुंबई मेट्रो-३ प्रकल्पांसाठी खेळाची आठ मैदाने आणि उद्यानांसह महापालिकेचे १७ भूखंड अवघ्या एक रुपयांच्या नाममात्र दराने भाडेकरारावर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एमएमआरसीएल) देण्याचा निर्णय गुरुवारी सुधार समितीचा बैठकीत घेण्यात आला.
मुंबई – मुंबई मेट्रो-३ प्रकल्पांसाठी खेळाची आठ मैदाने आणि उद्यानांसह महापालिकेचे १७ भूखंड अवघ्या एक रुपयांच्या नाममात्र दराने भाडेकरारावर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एमएमआरसीएल) देण्याचा निर्णय गुरुवारी सुधार समितीचा बैठकीत घेण्यात आला. मात्र या बरोबरच भविष्यात या प्रकल्पासाठी लागणा-या जागा कायमस्वरूपी देताना बाजारभावानुसारच देण्यात याव्यात, असा निर्णय घेत शिवसेना-भाजपाने स्वत:च्या सरकारलाही विचार करायला लावले आहे.
परंतु नियमबाह्य प्रस्तावाला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतरही सत्ताधारी शिवसेना-भाजपाने हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे प्रभादेवीतील नर्दुल्ला टँक, सानेगुरुजी मैदान, गँट्र रोड रेल्वे स्थानकाजवळील मैदानावर मुलांचा खेळ बंद होणार आहे. इतकेच नव्हे तर शहरातील उद्यानं आणि मनोरंजन मैदानेही देऊन अबालवृद्धांची रपेटही बंद होणार आहे.
[poll id=”909″]
मेट्रो लाईन-तीनच्या मार्गिकेला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर कुलाबा-वांद्रे आणि सिप्झ मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात २० किमी. लांबीचा भुयारी व उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे. तब्बल २७ रेल्वे स्थानके असलेल्या मेट्रो-तीनसाठी महापालिकेच्या ताब्यातील १४ जागा वापरासाठी घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी ११ महिन्यांच्या करारावर हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत रुपया दराने देण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सुधार समितीपुढे आला होता.
काँग्रेसचे नगरसेवक मोहसीन हैदर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत हा प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने आणल्याचे निदर्शनास आणले. प्रकल्पासाठी जागा देतानाच त्याचे मूल्य ठरवल्याने नियमांचा भंग झाला आहे. पालिका अधिनियमातील ९२ (सी)अंतर्गत हा प्रस्ताव आणल्याने तो अनधिकृत असून सरकारने निर्णय घेतल्याने रुपया नाममात्र दराने देत आहोत. हा एकप्रकारे महापालिकेच्या नियमांचा भंग आहे. सरकारने नाममत्र दराने हा प्रस्ताव देताना नियमाचा भंग करा, असे कुठेच म्हटले नाही. त्यामुळे कायदेशीर मत मागवून त्यानंतरच हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. काँग्रेसचे नौसिर मेहता यांनी ‘ग्रँट रोड रेल्वे स्थानकाशेजारी एकमेव खेळाचे मैदान आहे. तेही गेल्यास मुलांनी खेळायचे कुठे? असा सवाल केला. पालिकेने ३६ अटी व शर्थी ठेवल्या आहेत. परंतु त्यांची काटेकोर अंमलबजावणी कशी होईल, असा सवाल प्रकाश गंगाधरे यांनी केला.
सरकारने मार्चमध्ये हा निर्णय घेत रुपया नाममात्र दराने जागा देण्याचा निर्णय घेतला असून काम पूर्ण झाल्यावर त्या जागा पुन्हा पालिकेला दिल्या जातील, असे उपायुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. यापुढे कायमस्वरूपी जागा मिळाव्यात अशी ‘एमएमआरसीएल’ची मागणी आहे. याचा स्वतंत्र प्रस्ताव त्यानंतर सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी उपसूचनेद्वारे मागणी करत भविष्यातील जागा बाजारभावाने देण्यात याव्यात, असे सांगितले. याला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर उपसूचनेसह १४ जागा भाडेकरारावर देण्याचा प्रस्ताव सुधार समिती अध्यक्षा उज्ज्वला मोडक यांनी मंजूर केला.
मेट्रो रेल्वे-तीनची प्रमुख वैशिष्टय़े
स्थानके : २७
लांबी : ३२.५ कि.मी.
मार्ग : भुयारी
डबे : वातानुकुलित आठ
प्रकल्प खर्च : २३,१३६ कोटी रु.
येथे खेळाला बंदी
प्रकाश पेठे मार्गावरील कुलाबा वुड्स गार्डन
डॉ. डी. एन. रोडवरील भाटिया बाग
विधानभवन येथील अग्निशमन केंद्राजवळील उद्यान
जे. आर. डी टाटा मार्गावरील रोटरी उद्यान
हुतात्मा चौकातील उद्यान
ग्रँट रोड रेल्वे स्थानकाजवळील खेळाचे मैदान
सानेगुरुजी व नायर रोड चौकातील मनोरंजन मैदान
सिद्धिविनायक मंदिराजवळ नर्दुल्ला टँक मैदान व सानेगुरुजी मैदान