मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेनंतर आता म्हाडाला जाग आली असून, प्रथमच आपल्या सर्व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेनंतर आता म्हाडाला जाग आली असून, प्रथमच आपल्या सर्व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून, पुढील बैठकीत त्यासाठी धोरण ठरवून नियोजन केले जाणार असल्याचे माहीतगारांनी सांगितले.
म्हाडाच्या सुमारे ३,७०० इमारती आहेत. त्यातील १०४ इमारतींचे ले-आउट झाले असून, त्यात सुमारे एक लाख घरे आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी म्हाडाच्या अभियंता पॅनलची नियुक्ती क रण्यात येणार आहे. मात्र आवश्यकता भासल्यास बाहेरील संस्थेचाही यासाठी विचार केला जाणार असल्याचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी एन. के. सुधांशू यांनी सांगितले.
मुंब्रा येथील घटनेनंतर उशिरा का होईना म्हाडाने आपल्या जुन्या इमारतींकडे लक्ष वेधले आहे. १५ वर्षापूर्वीच्या जुन्या इमारतींचे ऑडिट क रताना इमारतीचे बांधकाम कधी झाले, त्या इमारतीचे पुढील आयुष्य किती आहे, इमारतीचे कामकाज करताना वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा कसा होता, तसेच अभियांत्याने किती कालावधीत इमारतीचे बांधकाम पूर्ण केले, आदी बाबी तपासल्या जातात.
या ऑडिटनंतर म्हाडा धोकादायक इमारतींची यादी जाहीर करणार आहे. धोकादायक ठरणा-या इमारतींमधील रहिवाशांना इतरत्र जागा देण्यात येणार आहे. त्यानंतरच आवश्यकतेनुसार संबंधित इमारतींची दुरुस्ती अथवा पुनर्विकास करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे सुधांशू यांनी सांगितले.