म्हाडासंदर्भातील सामान्यांचे प्रत्येक काम वेळेत व्हावे, ठिकठिकाणी न फिरता एकाच छताखाली सामान्यांना चौकशी करता यावी यासाठी २०१३ साली म्हाडाद्वारे ‘मित्र’ ही ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली होती.
मुंबई- म्हाडासंदर्भातील सामान्यांचे प्रत्येक काम वेळेत व्हावे, ठिकठिकाणी न फिरता एकाच छताखाली सामान्यांना चौकशी करता यावी यासाठी २०१३ साली म्हाडाद्वारे ‘मित्र’ ही ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली होती.
‘सेतू कार्यालया’च्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत येत्या काही दिवसांत आमूलाग्र बदल होणार आहेत.
या योजनेअंतर्गत सामान्यांच्या शंकांचे निरसन लवकरात लवकर व्हावे, माहिती त्वरित मिळावी यासाठी म्हाडाच्या संबंधित मंडळाला ठरावीक कालावधी देण्यात येणार आहे.
तसेच दलालांचा वाढता शिरकाव लक्षात घेता या योजनेअंतर्गत पुरविल्या जाणा-या सुविधा ऑनलाईन करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
अलीकडे म्हाडाद्वारे त्यांच्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल करण्यात आले. फायली, कागदपत्रांची जागा संगणक, टॅबलेटने घेतली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कार्यालयात सीसीटीव्हीचे जाळे बसविण्यात आले. हा बदल करताना म्हाडाने सर्वसामान्यांच्या सुविधांसाठीही मोठा बदल केला.
सामान्यांसाठी असणारी सोडत प्रणाली ऑनलाईन केल्याने सोडतीत पारदर्शकता आली, तसेच म्हाडासंदर्भातील सामान्यांचे प्रत्येक काम एकाच छताखाली व्हावे यासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली.
असे असतानाही नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस कायम असून कामात दिरंगाई होत असल्याचे म्हाडाला निदर्शनास आले. त्यामुळे या प्रक्रियेत सुसूत्रता यावी यासाठी ‘एक खिडकी योजने’चा विस्तार करत नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी म्हाडाने पावले उचलली आहेत.
ना देय दाखला, सोडत संदर्भातील माहिती, सदनिका आणि गाळे विक्री परवानगी, वारसांच्या नावे भोगवटा बदल, सदनिका-भूखंड नियमितीकरण, सहकारी संस्थेच्या नावे अभिहस्तांतरण, मिळकत, करावरील नाव बदलण्यासाठी ना हरकत अशा एकूण १५ प्रकारचे दाखले आणि इतर सुविधा ‘एक खिडकी योजने’अंतर्गत सामान्यांना पुरविण्यात येतील.
सामान्यांद्वारे विचारण्यात आलेली माहिती संबंधित मंडळाच्या अधिका-यांना थेट कळवली जाईल आणि हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळेचे बंधनही दिले जाईल. दलालांचा शिरकाव टळावा यासाठी या योजनेतील अधिकाधिक सुविधा ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सामान्यांना उपलब्ध करून देण्याचीही योजना आखण्यात आली आहे.
म्हाडात येणा-या सर्वसामान्यांचा वेळ वाचावा, त्यांचे काम त्वरित व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘एक खिडकी योजने’चा विस्तार करण्यात येत आहे. त्यासाठीची पूर्वतयारी सुरू असून ही योजना अधिक प्रभावीरित्या राबविता यावी यासाठी प्रत्येक मंडळाच्या अधिका-यांना आदेशही देण्यात आले आहेत.
– एस. एस. झेंडे, म्हाडा उपाध्यक्ष-मुख्य कार्यकारी अधिकारी‘एक खिडकी योजने’अंतर्गत सर्वसामान्यांना १५ प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातील. तसेच या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची आमची योजना असून त्यासंदर्भातील प्रक्रियाही सुरू आहे.
– महेंद्र वारभूवन, प्राधिकरणाचे उपमुख्य अधिकारी