जागतिक बाजारात तेल आणि वायूच्या किमती २०१६ मध्येही कमीच राहणार आहेत, असा अहवाल मूडीज या जागतिक संस्थेने दिला आहे.
नवी दिल्ली – जागतिक बाजारात तेल आणि वायूच्या किमती २०१६ मध्येही कमीच राहणार आहेत, असा अहवाल मूडीज या जागतिक संस्थेने दिला आहे. तेल आणि वायूच्या जादा पुरवठय़ामुळे उत्खननासाठी कंपन्या किमान २० ते २५ टक्के भांडवल कपात करतील, असा अंदाज वर्तवला आहे.
कच्च्या तेलाच्या अतिरिक्त पुरवठय़ामुळे यंदाही तेल व वायूच्या किमती खालीच राहतील. तेल निर्यातदार देश (ओपेक)आणि अनेक ओपेकचे सदस्य नसलेले देशही बाजारपेठेतील आपला वाटा कायम राखण्यासाठी झगडत असल्याने तेलाच्या उत्पादनावर कोणतीही मर्यादा आणणार नाहीत. वाढीव उत्पादन तर चीन, भारत आणि अमेरिकेसारख्या प्रमुख तेल उपभोक्ता देशांमधील तेलाच्या उपभोगापेक्षाही जास्त झाले आहे.
इराणवरील निर्बंध हटवण्यात येण्याची शक्यता २०१६ मध्ये असल्याने तर तेलाचा पुरवठा आणखी मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. अमेरिकेतील उत्पादनाएवढा किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो, असे मूडीजने म्हटले आहे. तेल आणि वायू क्षेत्राची अवस्था कठीण होणार असून वस्तूंच्या किमती सतत कमी राहतील. मूडीजच्या भाकितानुसार ब्रेंट क्रुड तेलाचा दर ४३ अमेरिकन डॉलर प्रतिबॅरल इतका राहील व पुढील वर्षी तो ४८ डॉलर प्रतिबॅरल इतका वाढेल.
तेल व नैसर्गिक वायूच्या किमती उतरल्याचा परिणाम आताच तेल उत्खनन कंपन्यांमध्ये दिसू लागला असून कंपन्यांनी उत्खनन व उत्पादनाकडील निधीचा ओघ आटवला आहे. अनेक कंपन्यांना भांडवल वाढवण्यासाठी मालमत्ता विकणेही भाग पडण्याची शक्यता आहे. ऊर्जा क्षेत्रातील मालमत्ता खरेदी करण्याच्या संधी मिळतील, परंतु वस्तूंच्या किमती कमी राहिल्याने संभाव्य खरेदीदारांना ते आव्हानच असेल.
पंतप्रधानांची जागतिक तज्ज्ञांशी चर्चा
११ वर्षात प्रथमच जागतिक बाजारपेठेत तेलाच्या खाली गेलेल्या किमतींमुळे तेल आणि वायू उत्पादकांना खर्चात कपात करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या क्षेत्रात गुंतवणूक कशी आकर्षित करता येईल, यावर जागतिक तज्ज्ञांशी विचारविनिमय केला.
बीपी ग्रुपचे सीईओ बॉब डुडली आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे कार्यकारी संचालक फती बिरोल यांच्यासह जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांशी मोदी यांनी दोन तास चर्चा केली. गेल्या पाच वर्षात तेलाचा कोणताही मोठा शोध लागलेला नसताना देशांतर्गत तेल आणि वायू क्षेत्राला चालना देण्यासाठी काय पावले उचलावी लागतील, यावर त्यांनी विचारमंथन केले.
तेल आणि वायू उत्खनन व उत्पादनात गुंतवणूक कशी आकर्षित करता येईल, या विचाराने ही चर्चा प्रेरित होती. रॉयल डच शेलचे संचालक हॅरी ब्रेकेलमान्स आणि पुलित्झर पुरस्कारविजेते डॅनियल येर्गिन यांनी नियमनातील चुका अधोरेखित केल्या. तसेच नैसर्गिक वायूच्या किमती मुक्त केल्या पाहिजेत, यावर त्यांनी जोर दिला. ऊर्जेमध्ये नैसर्गिक वायूचा वाटा वाढवण्यावर मोदींनी चर्चा केली. सध्या नैसर्गिक वायूचा वाटा अवघा ११ टक्क्यांवर असून तो २० टक्के केला पाहिजे, ज्यामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी करता येईल आणि अर्थव्यवस्थेला स्वच्छ इंधन पुरवता येईल, असे मोदी म्हणाले.