आपले घर इतरांपेक्षा वेगळे दिसावे, घराच्या सजावटीची, नेटकेपणाची सर्वानी नोंद घ्यावी याचा विचार आपण नेहमीच करत असतो. त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय, क्लृप्त्या लढवत असतो. जेणेकरून आपल्या आवडत्या घराला एक वेगळा आणि सुंदर लुक मिळावा, अशा विचारातून विविध कल्पना येतात आणि सजावटीच्या नवनवीन गोष्टी उदयाला येतात. प्रत्येक सणाला वेगवेगळे फर्निचर किंवा रंग बदलू शकत नाही. मग घराला वेगळा आणि हटके ‘लुक’ कसा द्यावा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ‘उशी’चा (पिलो) पर्याय तुमच्यासमोर आहे.
घराचा ‘लुक’ बदलण्यासाठी ‘कुशन’ हा छोटासा, पण अगदी परिणामकारक टूल आहे. ‘उशी’चा घरामध्ये सहज वापर झालेला दिसतो. या उशीच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराला वेगळे लुक देऊ शकता. डिजिटल प्रिंटेड कुशन कवर, एम्ब्रॉईडरी कुशन कवर, फॉइल कुशन कवर, डक प्रिंटेड सारखे वेगवेगळे कुशन व कुशन कवर तुम्हाला बाराजामध्ये सहज उपलब्ध आहेत. कुशन तशी छोटीशी वस्तू आहे पण ती योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने ठेवल्यास तिच्यामध्ये आपल्या घराचा चेहरा बदलण्याएवढी ताकत आहे.
सोफ्यावरील कुशन : सणांच्या दिवसांमध्ये हॉलमधील सोफ्यावर कुशनसाठी सोनेरी, पिवळसर, निळा, नारिंगी या रंगाचा वापर करा. हॉल हा घराचा चेहरा असतो आणि इथे वापरलेली वस्त्रे आणि वस्तू घरातल्या मंडळींचे स्वभाव आणि विचार यांची कल्पना देतात. कुशनच्या वापराने योग्य ती सकारात्मकता निर्माण केली जाऊ शकते. खणाच्या कापडाचा वापर करूनसुद्धा तुम्ही माजघराला वेगळा पारंपरिक ‘लुक’ देऊ शकता. तुमचा सोफा किंवा बैठकीचा आकार बघूनच तुमच्या कुशनचा आकार ठरवा.
लहान मुलांच्या खोलीमधील कुशन : लहान मुलांच्या खोलीमधील वातावरण हे नेहमीच हसत खेळत राहायला हवे. याकरिता घरातील भित्तीवरील रंग याबरोबरच लहान मुलांच्या खोलीमधील कुशन या घटकाकडे देखील लक्ष द्या. आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकाचे फ्रुट्स, टेडी, प्राणी यांच्या आकारांचे कुशन सहज उपलब्ध होतात. अशा कुशनच्या वापराने खोली सुशोभित होतेच. शिवाय खोलीतील वातावरण हलके-फुलके आणि खेळकर होते.
बेडरूममधील पिलो : बेडरूम ही आराम करण्याची जागा असते. दिवसभराच्या धकाधकीतून आपण काही क्षण निवांत घालवतो, त्या झोपण्याच्या खोलीमध्ये सध्या सिम्पल पिलो ठेवणे केव्हाही चांगले असते, त्यामुळे खोलीतील साधेपणा टिकून राहतो. तसेच तुम्हाला ताजेतवाने (फ्रेश) वाटेल. सध्या बाजारात वेगवेगळय़ा फीलच्या आणि आकाराच्या उशा उपलब्ध आहेत. सर्वानाच नरम उशा आवडत नाहीत. अशा वेळी आपल्या आवडीच्या फीलची उशी आपली उत्तम मित्र बनून जाते.
अशा प्रकारे आपण उशांची योग्य डिझाईन, रंग, आकार वापरून आपण आपले घर चांगल्या प्रकारे सजवू शकतो. तसेच घरामध्ये आनंद आणि सकारात्मकता निर्माण करू शकतो.