दहा किलो तांदूळ, दोन किलो साखर, अर्धा किलो मूग, चार साबणाच्या वडय़ा.. महिन्याची सुरुवात झाली की आधी यादी बनवून किराणा दुकानदाराकडे द्यायची. यादी दिली की त्याच्याकडचा एखादा पोरगा सामान घेऊन यायचा. सामानाची तपासणी झाली की मग काय तो पैशाचा व्यवहार आटोपायचा. पण आता बिग बाझार, डी मार्टसारखी सुपर मार्केट सुरू झाल्यामुळे आता ग्राहकवर्ग वळला आहे तो मॉलमधील खरेदीकडे. तिथे कसं सगळं सामान समोरच दिसतं. घरच्या सामानाखेरीज तिथे कपडे, सौंदर्यप्रसाधनं, स्टेशनरीच्या वस्तूही उपलब्ध असतात, त्यामुळे खरेदी करणं सोपं होऊन जातं. मॉलच्या वाढत्या संख्येमुळे रिटेलिंगचं क्षेत्रदेखील प्रगत होत चाललं आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या संधीही वाढत आहेत.
रिटेल मॅनेजमेंटचं क्षेत्र अफाट विस्तारलं आहे. आता यात केवळ घरगुती सामानच येत नाही तर साध्या स्टेशनरीच्या वस्तूंपासून ते अगदी लाखो रुपये किमतीच्या लक्झरी गुड्सपर्यंत सर्व काही रिटेलनं सामावून घेतलं आहे.
रिटेलिंग इंडस्ट्रीमध्ये दुकानं, डिपार्टमेंटल स्टोर्स, मॉल, सुपर मार्केट, बडय़ा ब्रँड्सची आउटलेट्स यांचा सामावेश होतो. डी-मार्ट, रिलायन्स फ्रेश, अपना बाझार, फुड बाझार, स्टार बाझार यांसारख्या सुपर मार्केट्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशी मार्केट्स एकाच ठिकाणी नसून त्यांच्या शाखा सगळीकडे असतात. या सुपर मार्केटमध्ये किराणा माल, फर्निचर, स्टेशनरीच्या वस्तू, कटलरी, खाद्यपदार्थ, पॅक केलेले पदार्थ, सौंदर्यप्रसाधनं आणि अन्य काही गृहोपयोगी उत्पादनांचा सामावेश असतो. कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अॅक्सेसरीज यांच्या दुकानांचा डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये सामावेश होतो. अशा सुपर मार्केट आणि डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या विभागांनुसार रिटेलिंगची कामं विभागलेली असतात. दिवसेंदिवस मॉलदेखील आकारानेही मोठे होऊ लागले आहेत. त्यामध्ये केवळ दुकानंच नसतात तर आता सिनेमा हॉल,फूड कोर्ट वगैरेंचाही समावेश होऊ लागला आहे. फूड कोर्टसारख्या ठिकाणी स्नॅक्सचे, आइस्क्रीमचे, ज्युसचे, केक-पेस्ट्रीजचे, चहा-कॉफीचे, चाटचे असे कितीतरी स्टॉल एकत्र असतात. प्रत्येक स्टॉलप्रमाणे तिथे काम करणा-या मनुष्यबळाची गरज असते. ज्यामध्ये एस.एस.सी. पास असणा-यांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सर्वानाच प्रचंड संधी उपलब्ध आहे. कारण या क्षेत्रात विविध प्रकारची कामं करणा-या कर्मचा-यांची मोठय़ा संख्येने गरज निर्माण झाली आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही रिटेलिंग या क्षेत्रात करिअर करायला वाव आहे.
रिटेल क्षेत्रामध्ये मनुष्यबळाची विभागणी
ऑपरेशन्स : असिस्टंट मॅनेजर्स, मॅनेजर्स, जनरल मॅनेजर्स, व्हाइस प्रेसिडंट
सप्लाय चेन मॅनेजर : एक्झिक्युटिव्हज मॅनेजर्स, व्हॅल्यू चेन हेड
र्मचडायझर्स : रिटेल व्यवसायात दोन प्रकारचे र्मचडायझर्स असतात. एक म्हणजे बायर्स र्मचडायझर्स, जे स्टोअर्ससाठी विक्रेत्याची निवड करतात, शोधक व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर असते. दुसरे व्हिज्युअल र्मचडायझर्स, ज्यांच्यावर संपूर्ण स्टोअर आणि तेथील वस्तूंचा दर्जा यांची जबाबदारी असते. तसेच सेल्स एक्झिक्युटिव्ह्ज, डिपार्टमेंट मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, एरिया मॅनेजर, ऑपरेशन्स हेड इत्यादी. त्याचप्रमाणे काही इतर पदेदेखील आहेत.
रिटेलिंगमधील कामाचे विभाग
ग्राहक सेवा विभाग : या विभागामध्ये ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करणं, ग्राहकांना वस्तू बदलून देणं, आफ्टर सेल्स सव्र्हिसची जी काम असतात ती कामं या विभागात केली जातात.
भांडार विभाग : मॉलमध्ये आणल्या जाणा-या वस्तूंचा व्यवस्थित साठा करणं. तिचं व्यवस्थापन करून योग्य त्या ठिकाणी ठेवणं, बिलं सांभाळणं अशा प्रकारची कामं या विभागाद्वारे केली जातात.
निरीक्षण आणि सुरक्षा विभाग : मॉलमध्ये इतक्या वस्तू एकत्रित ठेवलेल्या असतात त्यामुळे नक्कीच त्या वस्तूंच्या सुरक्षतेचा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे तेथील सुरक्षा पाहण्याची संपूर्ण जबाबदारी सुरक्षा विभागाकडे असते. क्लोज सर्किट टीव्हीच्या माध्यमातून जसं दुकानात लक्ष ठेवलं जातं तसंच तिथे काम करणा-या कर्मचा-यांवरही लक्ष ठेवण्याचं काम निरीक्षण विभागाकडे असतं. या विभागामुळे चोरीमारीसारख्या गोष्टींमुळे मोठय़ा प्रमाणात होणारं नुकसान होत नाही.
कॅश काउंटर : सुपरमार्केट किंवा कोणत्याही स्टोअर्समधील मागील आणि पुढील दोन्ही बाजूच्या पैशाचे जे व्यवहार केले जातात ते सांभाळण्याचं काम या विभागाद्वारे होतं.
मॉल प्रशासन : मॉलमधील सुरक्षा, स्वच्छता, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृह यांचं व्यवस्थापन केलं जातं. मॉल प्रशासनात काम करणा-या व्यक्तीला तिथल्या प्रत्येक दुकानाची पूर्ण माहिती असणं आवश्यक असतं.
शेल्फ मॅनेजमेंट : मॉलमधील उत्पादनांचं व्यवस्थित नियोजन करणं, संपलेली उत्पादनं पुन्हा शेल्फमध्ये ठेवणं, हे काम शेल्फ मॅनेजमेंट विभाग करत असतो. प्रत्येक कर्मचा-याला काम करण्यास एक ठराविक विभाग दिलेला असतो. त्या विभागात येणा-या मदत करण्याचं कामही शेल्फ मॅनेमेंटकडे असतं.
मानव विभाग : कामाचं विभाजन करणं, कर्मचा-यांना त्यांच्या गरजेनुसार वेळेनुसार वेगवेगळ्या शिफ्ट देणं हे काम मानव विभागाकडे असतं. कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याचं कार्य हा विभाग करत असतो. या विभागात शिक्षण घेता घेता जर पार्ट टाइम काम करण्याची इच्छा असेल तर करू शकतो. मात्र त्यासाठी मार्केटिंग, लॉजिस्टिक, विक्रीबाबत ज्ञान असणं गरजेचं असतं.
रिटेल मॅनेजमेंटमधील प्रशिक्षण देणा-या काही संस्था
»गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, सांताक्रूझ
»रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सहारा रोड, अंधेरी
»वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, माटुंगा
»एशिया-पॅसिफिक इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, नवी दिल्ली
»या संस्थांमध्ये प्रोग्राम इन रिटेल मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम, रिटेल मॅनेजमेंट, व्हिज्युअल र्मचडायझिंग असे रिटेलिंगशी निगडित कोर्स उपलब्ध आहेत.
कौशल्य
»उत्तम संभाषणकौशल्य, विक्रीकौशल्य, वस्तूंची प्रदर्शनीय व आकर्षक मांडणी, प्रत्येक उत्पादनांविषयीचं ज्ञान, उत्तम सेवा, विविध स्वभावाच्या ग्राहकांशी तत्परतेने बोलण्याची, त्यांना उत्पादनाविषयी व्यवस्थित माहिती देण्याची कला अशा गुणांची आवश्यकता असते.
»ऑनलाइन विक्रीसाठी त्या तंत्रज्ञानाचं पुरेसं ज्ञान, रिटेल व मार्केटिंगमधील सखोल ज्ञान.
»आर्थिक बाबींविषयक ज्ञान असणं, स्टॉक तपासून पाहण्याची काम करणं, अंकगणितीय ज्ञान चांगलं असणं गरजेचं असतं.
»या क्षेत्रात करिअर करायचं असल्यास उत्साहीपणा, लवचिकता, लोकांना सोबत घेऊन काम करण्याची तयारी हवी.