‘तुला पाहते रे’ ही वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेमकथा घेऊन ‘झी मराठी’ येत आहे. वेगळय़ा धाटणीच्या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर पुनरागमन करत आहे. तब्बल दोन वर्षानंतर तो टीव्ही मालिकेकडे परतत आहे.
‘तुझं माझं ब्रेकअप’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून, त्याजागी ‘तुला पाहते रे’ ही नवी मालिका १३ ऑगस्ट पासून रा. ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची आहे.
विक्रम सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा व्यावसायिक. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे, चाळ आणि मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर. दोघे कसे भेटतात? त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर होते, हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल. या मालिकेतून पुण्याची गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री छोटय़ा पडद्यावर पदार्पण करत आहे.