कोणता तरी पाळीव प्राणी अथवा पक्षी, मासे घरी घेऊन येणे, हा आजच्या काळातील आवडता छंद बनला आहे. पण त्याला योग्य पद्धतीने सांभाळावे कसे, त्याला अनुकूल असणा-या गोष्टी कोणत्या, त्याच्या व्याधींविषयी काय, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आणि त्याचबरोबर पक्षी व प्राण्यांबद्दल भरपूर उपयुक्त माहिती ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळविण्याची नामी संधी मुंबईकरांना मिळणार आहे. २७ एप्रिल ते १ मेदरम्यान हे प्रदर्शन अंधेरी येथील भवन्स कॉलेज कॅम्पस, भवन्स नेचर अॅण्ड आडव्हेंचर सेंटर, गेट क्रमांक ४ मध्ये दर दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत भरविण्यात आले आहे. प्रदर्शनासाठीचे प्रवेश शुल्क १००/१५० रुपये प्रती माणसी आकारण्यात आले आहे
प्रदर्शनात आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन आणि इतर देशांतील पक्ष्यांच्या १२० जाती; त्यांचे मूळ गाव ते त्यांच्या खाण्यापासून इतर सवयींबद्दलची सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल. अरकारी टोकन, स्टेलास, असंख्य प्रकारचे आफ्रिकन पोपट, कनूर जातीचे रंगीबेरंगी पक्षी, हाताच्या बोटावर बसणारे लव्ह बर्डस, फिंचेस आणि इतर अनेक प्रकार, सुंदर रंगीत दिसणा-या कोंबडय़ा (परदेशी) अशा या वैविध्यपूर्ण पक्ष्यांचा डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा शो असणार आहे.
आपण फक्त पक्षीच बघायचे नाही तर त्यासोबत सुंदर दिसणा-या परदेशी बक-या, गिनिपिग, ५ फूट उंचीचा इमू.. अशाप्रकारे अनेक प्राण्यांची हजेरी येथे आहे. आजच्या काळात प्लास्टिक खेळणी, प्लास्टिकचे सामान वापरून केलेले सजावटीचे साहित्य मत्स्यालयात वापरू नये, हा संदेश देण्यासाठी पूर्ण ख-या झाडांनी सजवलेली सुमारे ३० मत्स्यालये आणि माशांच्या १००हून जास्त जाती प्रदर्शनात बघायला मिळतील. तसेच सोबत समुद्री खा-या पाण्याच्या सुमारे ३० जातीच्या माशांचाही समावेश प्रदर्शनात करण्यात आला आहे.
>> प्रदर्शनासाठीचे प्रवेश शुल्क – १००/१५० रुपये प्रती माणसी.
>> स्थळ – भवन्स कॉलेज कॅम्पस, भवन्स नेचर अॅण्ड आडव्हेंचर सेंटर, गेट क्रमांक ४
>> दिनांक : २७ एप्रिल ते १ मे