महाराष्ट्र पुरोगामी राज्य असले तरी, येथे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी आहे. महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११.२३ कोटी आहे. यामध्ये महिला लोकसंख्येचे प्रमाण ४८.१७ टक्के आहे.
मुंबई – महाराष्ट्र पुरोगामी राज्य असले तरी, येथे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी आहे. महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११.२३ कोटी आहे. यामध्ये महिला लोकसंख्येचे प्रमाण ४८.१७ टक्के आहे. राज्यातील महिला लोकसंख्येचा विचार करता त्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण कमी आहे.
वयाची अठरावर्ष पूर्ण झालेल्या तरुणींनी नोंदणी न केल्यामुळेही महिला मतदारांची संख्या कमी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात फक्त ६५.७ टक्के महिलांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकहजार पुरुषांमागे महिलांची संख्या ९२५ आहे.
मागच्या दशकात महिला मतदारांचे राष्ट्रीय़ सरासरी प्रमाण ८८३ होते. एकहजार पुरुषांमागे ८८३ महिला मतदारांची नोंद होती. १९६०-७० च्या दशकात हेच प्रमाण ७१५ होते. महाराष्ट्रातील मागच्या काही विधानसभा निवडणुकांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला कमी संख्येने मतदानाला उतरल्या. अपवाद फक्त १९९५च्या निवडणुकीचा. या निवडणुकीत महिला मतदानाचे प्रमाण ७०.६ टक्के होते.
मागच्या सहा विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला महिलांनी जास्त मतदान केले मात्र तरीही, महिला मतदान ५० टक्क्यांपर्यंत पोहचू शकले नाही. महिलांमध्ये मतदानाची जनजागृती केल्यामुळे गेल्या वीस वर्षात महिला मतदानाची सरासरी वाढली आहे. महिलांनी कमी संख्येने मतदान करण्यामागे दोन कारणे असू शकतात. शांतता, विकसित भागांमध्ये महिला जास्त संख्येने मतदानाला उतरतात तर, जात, धर्म, जातीय तेढ असलेल्या भागांमध्ये महिला कमी संख्येने मतदानाला उतरतात.