‘शहीद भगतसिंग यांची उपेक्षा’ या मथळयाखाली दैनिक ‘प्रहार’ने रविवारी बातमी प्रसिद्ध करताच त्याची मीरा भाईंदर महापालिकेने त्वरित दखल घेत भगतसिंग यांचा पुतळा पुन्हा सन्मानाने बसवण्याचे आश्वासन दिले आहे.
भाईंदर – ‘शहीद भगतसिंग यांची उपेक्षा’ या मथळयाखाली दैनिक ‘प्रहार’ने रविवारी बातमी प्रसिद्ध करताच त्याची मीरा भाईंदर महापालिकेने त्वरित दखल घेत भगतसिंग यांचा पुतळा पुन्हा सन्मानाने बसवण्याचे आश्वासन दिले आहे.
भाईंदर पश्चिम भागात मीरा भाईंदर महापालिकेने तत्कालीन नगरसेवक मिलन म्हात्रे यांच्या निधीतून २००४ साली उद्यान विकसीत करून त्यात शहीद भगतसिंग यांचा पुतळा उभारला होता. मात्र काही दिवसांपूर्वी भुयारी गटाराच्या कामासाठी तो पुतळा पेटीत बंद करुन ठेवण्यात आला. याबाबत अन्यायविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष पांडे आणि माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी महापालिकेला जाब विचारला होता.
याबाबतची बातमी ‘प्रहार’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पांडे यांनी उपोषणाचीही तयारी दाखवली होती. अखेर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी येथील काम पूर्ण होताच सदर पुतळा सन्मानाने त्याच ठिकाणी पुन:स्थापन करण्यात येईल, असे पांडे यांना लेखी कळविले असून यानंतर सुभाष पांडे यांनी ‘प्रहार’चे आभार मानले.