कधी ढगाळ वातावरण तर कधी ऊन-पाऊस अशा सततच्या बदलत्या वातावरणामुळे विविध आजारांनी शहरात पुन्हा डोके वर काढले आहे.
मुंबई- कधी ढगाळ वातावरण तर कधी ऊन-पाऊस अशा सततच्या बदलत्या वातावरणामुळे विविध आजारांनी शहरात पुन्हा डोके वर काढले आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मुंबईत सध्या डेंग्यूचे २८ रुग्ण आढळून आले असून त्यात शीव रुग्णालयातील डॉक्टरचा समावेश आहे. या रुग्णांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
ताप, हिवताप, सर्दी, खोकला आदी किरकोळ आजारांसोबत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. साथीच्या आजारांची वाढती आकडेवारी पाहता मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, जूनमध्ये तापामुळे ३,१११ रुग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अतिसार झालेल्या ६९५ रुग्णांची नोंद केली तर, अन्य आजारांच्या २०० हून अधिक रुग्णांवर उपचार सुरूआहेत. दरम्यान, जानेवारीपासून राज्यात थैमान घालणा-या स्वाईन फ्लूने पावसाळा सुरु झाल्यावर आपला कहर दाखवला सुरुवात केली आहे. कारण, गेल्या आठवडय़ात स्वाईन फ्लूमुळे राधिका कृष्णा या ३२ वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
ही महिला गोरेगावला राहणारी असून त्यांना १० जून रोजी ताप आणि सर्दी झाल्याने गोरेगाव येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, ताप कमी होत नसल्याने १२ जून रोजी त्यांना शीव रुग्णालयात हलवले. वैद्यकीय तपासणीनंतर राधिका यांना स्वाईन फ्लू असल्याने निदान झाल्यानंतर त्यांना १७ जूनला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारांना योग्य प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सध्याच्या वातावरणामुळे साथीच्या आजार पसरण्याची दाट शक्यता असते. पालिकेच्या विविध रुग्णालयात दररोजी अनेक रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यातील बहुतांश
लोकांना डेंग्यू असल्याची प्राथमिक लक्षण आढळून आली होती. परंतु, वैद्यकीय तपासणीनंतर २८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पालिकेच्या विविध रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, एप्रिलमध्ये डेंग्यूचे १२० तर मे महिन्यात ४० रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामानाने २१ जूनपर्यंत डेंग्यूचे २८ रुग्ण आढळून आले, अशी माहिती पालिकेच्या साथरोग विभागाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांनी दिली.
जूनचा अहवाल
एकूण रुग्ण पालिका रुग्णालयात दाखल
ताप ३,१११
मलेरिया ३५४
स्वाईन १९
अतिसार ६९५
डेंग्यू २८
हिवताप ७६