इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना गुरुवारपासून (९ जून) ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे.
लंडन- इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना गुरुवारपासून (९ जून) ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या श्रीलंकेसमोर ‘व्हॉईटवॉश’ टाळण्याचे आव्हान आहे.
कसोटी क्रमवारीतील (रँकिंग) अव्वल दहामध्ये असलेल्या श्रीलंकेकडून (आठवे स्थान) इंग्लंडला चुरशीची लढत अपेक्षित होती. मात्र फलंदाजी ढेपाळली आणि मोठय़ा पराभवांना सामोरे जावे लागले. पहिल्या कसोटीत श्रीलंकेला (९१+११९) यजमानांच्या एका डावाइतक्या (२९८) धावाही करता आल्या नाहीत. दुस-या कसोटीत इंग्लंडच्या ९ बाद ४९८ धावांच्या (डाव घोषित) प्रत्युत्तरादाखल पहिला डाव १०१ धावांत आटोपल्यानंतर श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. दुस-या डावात पाहुण्यांनी चार सत्रे खेळून काढताना पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला तरी पहिल्या डावातील हाराकिरी त्यांना नडली. तिसरी आणि अंतिम कसोटी किमान अनिर्णीत राखून ‘व्हाईटवॉश’ टाळण्याचा प्रयत्न अँजेलो मॅथ्यूज आणि सहकारी करतील. मात्र त्यासाठी फलंदाजी उंचवायला हवी.
दोन कसोटीतील चार डावांत श्रीलंकेतर्फे एक शतक आणि चार अर्धशतकांची नोंद झाली आहे. एकमेव शतक दिनेश चंडिमलचे आहे. कर्णधार मॅथ्यूजसह कुशल मेंडिस, कौशल सिल्वा आणि रंगना हेरथने एकेकदा अर्धशतकी मजल मारली आहे. पाहुण्यांना स्पेशालिस्ट आणि अनुभवी फलंदाजांची उणीव भासत आहे. लहिरु थिरिमनेकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र त्याला चार डावांत ७० धावा करता आल्या आहेत. श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही निराशा केली आहे. शेवटच्या कसोटीत गोलंदाजांना आपली उपयुक्तता दाखवून देण्याची संधी आहे.
घरच्या मैदानावर इंग्लंडने सातत्य राखले आहे. मात्र गेल्या वर्षी मायदेशातील शेवटच्या कसोटीत त्यांना पराभूत व्हावे लागले आहे. गेल्या वर्षी अॅशेस जिंकल्या तरी पाचव्या आणि अंतिम कसोटीत (ओव्हल) ऑस्ट्रेलियाकडून डावाने मार खावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांनंतर २-० अशी आघाडी होती. मात्र सेंच्युरियनवरील चौथ्या कसोटीत २८० धावांनी पराभूत व्हावे लागले. ‘होम ग्राउंड’वर इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध निर्भेळ यशाची संधी आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चुकांची पुनरावृत्ती करून चालणार नाही. अॅलिस्टर कुक आणि सहका-यांनी दोन्ही कसोटी सामने जिंकले तरी सर्वकाही आलबेल नाही. फलंदाजीत कर्णधार कुकसह सलामीवीर निक कॉम्प्टन, ज्यो रूटला फॉर्मची प्रतीक्षा आहे. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडने अचूक मारा केला तरी स्टीव्हन फिन आणि ऑफस्पिनर मोईन अलीला (२ विकेट) अपेक्षित सूर गवसलेला नाही. मोईनने एक शतक ठोकताना फलंदाजीत योगदान दिले. मात्र फिनला दोन कसोटीत केवळ चार विकेट मिळवता आल्यात.
वेळ : दु. ३.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्काय स्पोर्ट्सवर.