‘एचएसबीसी’ या संस्थेने मे महिन्यात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवल्याने सावध झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी मुंबई शेअर बाजारात विक्री केली.
मुंबई– ‘एचएसबीसी’ या संस्थेने मे महिन्यात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवल्याने सावध झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी मुंबई शेअर बाजारात विक्री केली. ज्यामुळे सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला आणि १९,६१०.४८ अंकावर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ४६.६५ अंकाची घट झाली आणि तो ५,९३९.३० अंकावर बंद झाला.
‘एचएसबीसी’ने मे महिन्यात कारखाना उत्पादनात विक्रमी घट होईल, असा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे बाजारातील भांडवली वस्तू, तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा या क्षेत्रात विक्री वाढली. कारखाना उत्पादन २००९ पेक्षाही कमी असेल, अशी भीती ‘एचएसबीसी’ने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिला असल्याचे शेअर दलालांनी सांगितले.
दरम्यान रुपयाचे डॉलरसमोर होत असलेले अवमूल्यनही बाजारातील विक्रीला बळ देऊन गेले. यामुळे सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. गेल्या महिनाभरातील त्याची ही नीचांकी पातळी ठरली. एकीकडे बाजारात विक्रीचा जोर असला तरी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसमध्ये गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली. त्याचबरोबर मे महिन्यात विक्रीमध्ये घट झाल्याचा फटका बाजारातील वाहन उत्पादक कंपन्यांना बसला.
सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपन्यांचे शेअर घसरले. यात हिरो मोटो कॉर्प ३.६५ टक्के, बजाज ऑटो ३.३२ टक्के, ओएनजीसी २.८५ टक्के, सन फार्मा २.६८ टक्के, एचडीएफसी २.४० टक्के, मारुती सुझुकी २.२७ टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज २.१७ टक्के, टीसीएस १.९४ टक्के, एचडीएफसी बँक १.६३ टक्के, भेलमध्ये १.४३ टक्क्यांची घट झाली. तर इन्फोसिस ४.४ टक्के, जिंदाल स्टील २.२ टक्के, टाटा स्टील १.६ टक्के, गेल इंडिया १.४ टक्क्यानी वधारले. जागतिक शेअर बाजारांमध्येही अमेरिकेतील आर्थिक आकडेवारीचा दबाव होता. यामुळे चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर यामधील शेअर निर्देशांकामध्ये घट झाली. तर ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स यांदेशातील शेअर बाजार घसरणीसह व्यवहार करत होते.
..मात्र मूर्तीमुळे इन्फोसिस फॉर्मात
नारायण मूर्ती यांना पुन्हा एकदा कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्याने कंपनीच्या शेअरला बाजारात मोठी मागणी होती. इन्फोसिसचा शेअर चार टक्क्यांनी वधारला. या तेजीमुळे कंपनीच्या बाजारातील भांडवलामध्ये ६,१०७ कोटींची वाढ झाली. दिवसभरामध्ये शेअरने नऊ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली होती. तर ४.४२ टक्क्यांच्या वाढीसह तो बंद झाला. यामुळे इन्फोसिसचे बाजारातील भांडवल ६,१०७ कोटींनी वाढून १,४४,३६० कोटींवर गेले.