‘समानता’ या शब्दाचे अर्थ वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे लावले जातात हे आपण पाहतो. मग ही समानता ‘स्त्री-पुरुष समानता’ असो, आर्थिक समानता असो किंवा ‘सर्वधर्मसमभाव’ या संकल्पनेतील समानता असो. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने समानतेकडे पाहत असते.
रविवार दि. ७ ऑगस्ट २०१६ रोजी अशाच समानतेच्या धाग्यामध्ये गुंफलेल्या नात्याचा प्रत्यय आला. निमित्त होते, गोरेगाव पूर्व येथील आश्लेषा नागरी निवारा सह. सो. (मर्यादित) या इमारतीची वार्षिक सर्वसाधारण सभा. सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वसाधारण सभेचे घोषवाक्य वेगळे होते ‘समानतेतील एकता व अखंडता’ आणि या सभेचे खास आकर्षण होते संस्थेतील आदरणीय व्यक्तिमत्त्व पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकर.
सुरुवातीलाच संस्थेचे सचिव यांनी प्रस्तावनेत सांगितले की, ‘समानतेच्या धाग्याप्रमाणे आजची आपली सभा गुंफली जाणार आहे आणि त्यातूनच एकतेचा अपूर्व सोहळा आपण आज पार पाडणार आहोत. आमच्या इमारतीमधील आदरणीय सभासद पंडित तुळशीदास बोरकर यांना या वर्षी भारत सरकारतर्फे संगीत श्रेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरविण्यात आले आहे.
याचा आम्हा सर्व सभासदांना अभिमान आहे. त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्थेतील १४ सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार पंडित तुळशीदास बोरकर यांच्या हस्ते करणार आहोत. हे संस्थेतील सेवानिवृत्त सभासद म्हणजे कोणी चतुर्थश्रेणी, कोणी तृतीय व द्वितीय श्रेणी, तर कोणी प्रथम श्रेणीमधून निवृत्त झालेले आहेत.
हे सारे बी.ई.एस.टी, महाराष्ट्र पोलीस, मंत्रालय, म्युनिसिपाल्टी, एअर इंडियामधून तर काही जण प्रायव्हेट कंपनीमधून सेवानिवृत्त झालेले आहेत. यांचे हुद्दे जरी प्रथम ते चतुर्थ श्रेणी असले तरी आमचे सभासद म्हणून ते आम्हास एक समान आहेत आणि म्हणून या सा-यांचा आम्ही सत्कार करणार आहोत.
संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत राणे म्हणाले की, ‘वार्षिक सभा’ या होतच असतात. त्यातूनच काहीसे वेगळे करण्याचा आमचा मानस असतो. या सर्व सेवानिवृत्त सभासदांचा आम्हास आदर आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थेच्या भावी वाटचालीसाठी होणार आहे.
पंडित तुळशीदास बोरकर यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आम्हास सभासद म्हणून लाभले, ते आमच्या इमारतीत राहतात याचा आम्हास अभिमान आहे. इतरांना हे सांगतानाही आम्ही गर्वाने सांगतो, आणि अशा व्यक्तिमत्त्वाच्या हातून प्रथम श्रेणीमधून ते चतुर्थ श्रेणीमधून सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार करून संस्थेच्या शिरपेचात ‘समानतेतून अखंडता’ हा तुरा आज रोवला जाणार आहे.
‘पद्मश्री तुळशीदास बोरकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, ‘आज हा जो तुम्ही माझा सत्कार करीत आहात तसेच भारत सरकारने पद्मश्री देऊन केलेला सन्मान म्हणजे मी देवाचा प्रसाद समजतो. मला गेल्या वर्षी ‘संगीत नाटक अॅकॅडमीचा’ पुरस्कार तसेच संगीत क्षेत्रातील बहुमानात्मक फेलोशिप’ मिळाली. हे सारे पुरस्कार म्हणजे लोकांचे माझ्याप्रती असलेले प्रेम व देवाचा आशीर्वाद असे मी मानतो.
त्याशिवाय हे शक्य नाही. आयुष्यामध्ये अनेक खडतर प्रसंग आले. परंतु न डगमगता त्या प्रसंगाना सामोरा जाऊन संगीताची निरंतर सेवा केली. त्याचे फळ उशिरा का होईना, पण मिळाले. आपल्या कामाप्रती गाढ श्रद्धा असली तर कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे धैर्य आपोआप येते. सर्व सेवानिवृत्त सभासदांचे अभिनंदन व सर्वाना दीर्घायुष्य लाभो.’ कार्यकारिणीने आखलेला हा अनोखा कार्यक्रम पाहून आम्ही सारे धन्य आहोत.
एका तपस्वी व्यक्तीच्या हातून, जाती-पाती, उच्च-नीच, लहान-मोठा, उच्च-कनिष्ठ याच्याही पलीकडे जाऊन एकतेच्या आणि समानतेच्या धाग्यामध्ये गुंफलेली ही सत्काराची गुंफण खरोखरच आमच्या उर्वरित आयुष्यासाठी शिदोरी ठरेल आणि त्याच विश्वासावर यापुढील वेळ जसा जमेल तसा संस्थेच्या वाटचालीसाठी आम्ही देण्याचा प्रयत्न करू असे श्री. चंद्रकांत देशमुख व विलास राणे या सेवानिवृत्त सभासदांनी मत मांडले. हा सोहळा आमच्यासाठी अपूर्व असा आहे आणि आमच्या जीवनप्रवासातील अविभाज्य क्षण आहे, असे मत श्री. गुजर यांनी व्यक्त केले.
कितीही संकटे आली तरी आम्ही सारे एक आहोत, आमची एकता कोणीही तोडू शकणार नाही. आम्ही नेटाने काम करीत राहू, असा सर्वासमोर एक आदर्श निर्माण करणे हा देखील आमचा हेतू होता, असे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. चंद्रकांत खोत यांनी मत मांडले व सभा समाप्तीची घोषणा केली.