भयंकर उकाडा जाणवायला लागला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना कोणते कपडे घालावेत असा प्रश्न आपल्याला दररोजच पडतो. डोळ्यांना सुखद वाटायला हवे, त्याचबरोबर ते कम्फर्टेबलही असायला हवेत. आणि आपला लूकही चांगला दिसायला हवा. असं वाटत असतं. या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही तुमचा वॉर्डरोब फ्लोरल पिंट्रने सजवायला हवाच.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. ऐन एप्रिलमध्येही भयंकर उकडायला लागलं आहे. त्यामुळे खाण्यापिण्यापासून अगदी वॉर्डरोबमध्येदेखील बदल करायला लागले आहेत. उन्हळ्याच्या दिवसांत फ्लोरल प्रिंटचा विचार करायला काहीच हरकत नाही.
यावर्षीच्या उन्हाळ्यात तुम्ही तुमचा वॉर्डरोब फ्लोरल प्रिंटने सजवा. ही प्रिंट एव्हरग्रीन असते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मलमल, कॉटन, लिनन अशा कोणत्याही प्रकारच्या कपडय़ांवर ही प्रिंट अगदी खुलून दिसते. या प्रिंटची खासियत म्हणजे यात अगदी बोल्ड आणि हलकी फुलकी डिझाइन अशा दोन्ही प्रकारच्या डिझाइन येतात.
या पिंट्रची खासियत.
» मुळातच फुलं, पान असलेली पिंट्र ही नाजूक असल्याने ती गो-या, सावळ्या रंगांच्याच नाही कोणत्याही वर्णाच्या महिलांना खुलून दिसते. बाहेरच्या रखरखत्या उन्हात अंगावर असलेली फुलं, पानं किंवा त्यासोबत असलेली फुलपाखरं डोळ्यांना आल्हाददायक वाटतात. त्यांच्याकडे बघूनच बाहेरच्या उन्हाचा रखरखाट काहीसा कमी जाणवतो. त्यामुळे साहजिकच आजूबाजूलाही प्रसन्न वातावरण निर्माण होतं. हे प्रिंट आकर्षक दिसण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे हे प्रिंट शक्यतो पांढ-या किंवा फिक्या रंगावर असतं. त्यामुळे ते खूपच खुलून दिसतं. ते खुलून दिसत असलं तरीही हे प्रिंट निवडताना तुमची पसंती आणि तुमचं व्यक्तिमत्त्व या दोन्ही गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर बारील अंगयष्टीच्या किंवा स्लीम फिगर असलेल्या महिलांना मोठया आकाराचं प्रिंट काहीसं बोल्ड लूक दिसतो. याउलट काहीसं मध्यम किंवा लहान आकाराचं प्रिंट असेल तर त्यामुळे सौंदर्य खुलल्याशिवाय राहात नाही.
» या प्रिंटचा तुम्ही मॅक्सी किंवा ड्रेस खरेदी करणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे अशा प्रकारच्या कपडय़ांवर बारीक डिझाईन किंवा बारीक फुलं असतील तर अधिक छान दिसेल. अलीकडे एकच फूल असलेल्या नक्षीचा ट्रेंड आहे, त्यामुळे तुमच्याकडे हा एका फुलाचा पर्यायही उपलब्ध आहे.
» पार्टीसाठीदेखील या प्रिंटचा विचार करायला हरकत नाही. इतकंच नाही तर कॅज्युअल वेअरसाठीदेखील फ्लोरल प्रिंटचा विचार करायला हरकत नाही.
» उन्हाळ्याच्या दिवसांत समोरच्यांनी घातलेली ही पिंट्रदेखील सुखद वाटते. त्यामुळे ऑफिस किंवा कॉलेजसाठीही या प्रिंटच्या कुर्त्यांचा विचार करायला हरकत नाही. ही प्रिंट स्टायलिश लुकही दर्शवतो.
» उन्हाळ्याचे दिवस म्हणजे लग्नसमारंभाचे दिवस. अशा वेळी भरजरी साडया किंवा ड्रेस घालायला नको वाटतं. लग्नाच्या दिवसांसाठीही तुम्ही या फ्लोरल प्रिंटचा विचार करायला हरकत नाही. या प्रिंटचे लेहंगेदेखील खूप छान दिसतात.
» उन्हाळ्याच्या दिवसांत या प्रिंटमुळे समारंभात तुम्ही खास आकर्षण ठराल यात काही शंका नाही. फॉर्मलसाठीदेखील तुम्हाला ब्लेझरमध्ये फ्लोरल पिंट्रचा पर्याय उपलब्ध आहे. जो तुम्हाला स्मार्ट आणि स्टायलिश लूक देईल. इतकंच नाही तर जंपसुटचाही पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे.