इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या अॅशेस कसोटी मालिकेत प्रथम फलंदाजी करणा-या इंग्लंडचा पहिला डाव ४३० धावांवर संपुष्टात आला.
कार्डीफ – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या अॅशस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुस-या दिवशी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या तीन बाद १८० धावा झाल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार देणारा रॉजर्स शतकाच्या समीप येऊन ९५ धावांवर बाद झाला. इंग्लंडचा गोलंदाज वूडने त्याला बटलरकरवी झेलबाद केले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद १४५ धावा होत्या.
ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून २५० धावांनी पिछाडीवर होता. इंग्लंडचा पहिला डाव ४३० धावांवर संपुष्टात आला.
चहापानाला खेळ खांबला तेव्हा रॉजर्स ७४ आणि कर्णधार मायकल क्लार्क ११ धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना अर्धशतकी सलामी दिल्यानंतर डेव्हीड वॉर्नरच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला.
वॉर्नरला १७ धावांवर अँडरसनने कुककरवी झेलबाद केले. दोघांनी ५२ धावांची सलामी दिली. त्यानंतर फलंदाजीला आलेला स्टीव्हन स्मिथने दुस-या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. मोईन अलीने स्मिथच्या ३३ धावांवर यष्टया वाकवल्या.
तत्पूर्वी, यजमानांचा पहिला डाव पहिल्या सत्रात ४३० धावांवर संपला. ७ बाद ३४३ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडने आणखी ८७ धावांची भर घातली. त्याचे श्रेय आठव्या क्रमांकावरील अष्टपैलू मोईन अलीला जाते.
२६ धावांवर खेळणा-या अलीने तिसरे अर्धशतक झळकावताना इंग्लंडला चारशेपार नेले. त्याच्या ८८ चेंडूंतील ७७ धावांच्या खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. पाहुण्यांची दिलेला २६ अवांतर धावांचा बोनसही यजमानांना फायदेशीर ठरला.
त्यात १७ बाईजसह ३ लेगबाईज, ५ नोबॉल आणि एका नोबॉलचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियातर्फे वेगवान मिचेल स्टार्क सर्वात यशस्वी ठरला. त्याने ११४ धावांत निम्मा संघ गारद केला. स्टार्कला वेगवान जोश हॅझ्लेवुड (३ विकेट) आणि ऑफस्पिनर नेथन लियॉनची (२ विकेट) चांगली साथ लाभली.