सलामीवीर शरजील खानच्या (८६ चेंडूंत १५२ धावा) तडाखेबंद खेळीच्या जोरावर पाकिस्तानने आर्यलडविरुद्धच्या पहिल्या वनडेत गुरुवारी ४६ षटकांत ६ बाद ३३७ धावा फटकावल्या.
डब्लिन- सलामीवीर शरजील खानच्या (८६ चेंडूंत १५२ धावा) तडाखेबंद खेळीच्या जोरावर पाकिस्तानने आर्यलडविरुद्धच्या पहिल्या वनडेत गुरुवारी ४६ षटकांत ६ बाद ३३७ धावा फटकावल्या. शरजीलची फटकेबाजी आणि दोन शतकी भागीदा-या पाकिस्तानच्या मोठय़ा धावसंख्येचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.
आर्यलडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मध्यमगती गोलंदाज बॅरी मॅककॅर्थीने अझर अलीला (१) लवकर माघारी धाडताना यजमानांना पहिले यश मिळवून दिले. मात्र शरजीलने फटकेबाजी करताना पाकिस्तानला मोठी धावसंख्या गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने अवघ्या ८६ चेंडूंत १६ चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांसह १५२ धावांची जबरदस्त खेळी केली.
त्याचे हे पहिलेच वनडे शतक आहे. वैयक्तिक कामगिरी उंचावतानाच शरजीलने मोहम्मद हफीझसह (३७) दुस-या विकेटसाठी ९२ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. त्यानंतर बाबर आझमसह (२९) तिस-या विकेटसाठी ९६ धावा जोडल्या. शरजील परतल्यानंतर शोएब मलिक (नाबाद ५७) आणि मोहम्मद नवाझने (५३) सहाव्या विकेटसाठी झटपट शतकी (९५ चेंडूंत १०५) भागीदारी रचताना पाकिस्तानला साडेतीनशेपार नेले.
नवाझने ५० चेंडूंत ७ चौकारांसह अर्धशतकी मजल मारली. शोएबने ३७ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ‘हाफ सेंच्युरी’ साकारली. आर्यलडतर्फे बॅरी मॅककॅर्थी (४ विकेट) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.