मुंबईतील १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.
मुंबई- मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील आगीच्या दुर्घटनेनंतर झोपडपट्टी व चाळींमध्ये वाढवलेल्या १४ फुटांपेक्षा अधिक बांधकामांचा सर्वे पूर्ण झाला आहे. या सर्व्हेत आढळलेल्या १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. पावसाळा संपल्याने या वाढीव अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम महापालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबईत हाती घेतली जाणार आहे.
मुंबईतील अनेक भागांमधील झोपडपट्टी व चाळींमध्ये घरांची उंची १४ फुटांपर्यंत वाढवण्यास परवानगी आहे. परंतु अनेक ठिकाणी या नियमाचे उल्लंघन झाले आहे. प्रत्येक भागामध्ये वाढीव उंचीचेच बांधकाम झाले आहे. अंधेरी पश्चिम येथे औषधांच्या दुकानाला लागलेल्या आगीत पक्क्या पोटमाळय़ांवर राहणारे मालकाचे कुटुंबच मृत्युमुखी पडले होते.
या दुघर्टनेनंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दोन महिन्यांपूर्वी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना आदेश देऊन महापालिकेच्या भूखंडावरील १४ फूटांवरील सर्व बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुखांची आढावा बैठक शनिवारी घेतली. यात १४ फूटांवरील बांधकामांच्या सर्वेक्षणाचा आढावा घेतला. महापालिकेच्या ज्या भूखंडावरील झोपडय़ांच्या वाढीव बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत, त्या सर्व भूखंडावरील झोपडय़ांबाबत कारवाई सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी या बैठकीत सर्व परिमंडळाचे उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांना दिले आहेत.
जिल्हाधिका-यांच्या जागेवरील बांधकामेही लक्ष्य
महापालिकेच्या भूखंडांवरील १४ फूटांपेक्षा अधिक बांधकामांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिका-यांच्या अखत्यारित येत असलेल्या भूखंडांवरील १४ फूटांपेक्षा अधिक उंची असलेल्या झोपडयांचेही सर्वेक्षण करून तो अहवाल संबंधित जिल्हाधिका-यांना सादर करून त्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, असेही आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
एफएसआय चोरांवरही होणार कारवाई
चटई क्षेत्र निर्देशांकातील (एफएसआय) अनियमिततांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त (अतिक्रमण निर्मुलन) मिलिन सावंत यांना दिले. या अंतर्गत कारवाई करताना पहिल्या टप्प्यात व्यावसायिक वापर करणा-या इमारती आणि बांधकामांवर केली जावी. त्यानंतर दुस-या टप्प्यात रहिवाशी वापर होत असलेल्या इमारती व बांधकामांवर केली जावी,असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहे. ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर याच प्राधान्यक्रमाने अंतर्गत स्वरुपातील बदल व फेरबदल करणा-यांवरही कारवाई केली जावी, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.