आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी विनेश फोगाट ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.
जकार्ता- भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने आशिया क्रीडा स्पर्धेच्या दुस-या दिवशी ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या युकी इरीवर ६-२ असा विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले.
भारतासाठी हे आतापर्यंतचे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी विनेश फोगाट ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.
पहिल्या डावात विनेशने बेसावध असलेल्या जपानची प्रतिस्पर्धी युकी इरीला चितपट करण्याचा प्रयत्न केला. विनेशचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. तरीही यातून तिने ४ गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. तर दुस-या डावात अखेरच्या सेकंदांमध्ये विनेशने युकी इरीचा पराभव करत सामना आपल्या नावावर केला. याआधी कुस्तीत भारताला बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवून दिले होते.
दरम्यान, आशियाई खेळांच्या दुस-या दिवशी पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्याआधी सकाळी दिपक कुमारने १० मी. एअर रायफल प्रकारात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिली होती. त्यामुळे आजच्या दिवसभरात दोन भारताला दोन रौप्य पदकाची कमाई करता आली आहे.
विनेशने ऑलिम्पिकमधील कसर भरून काढली
जकार्ता – विनेश फोगट हिने ऑलिम्पिक स्पर्धेमधील कसर भरून काढताना आशियाई स्पर्धेत भारताच्या महिलांचा दबदबा निर्माण केला. फोगट कुटुंबाची सदस्या असलेल्या २३ वर्षीय विनेश दोन वर्षापूर्वी झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत अपयशी ठरली. मात्र आशियाई स्पर्धेत ती पदक जिंकण्याच्या इराद्याने उतरली. चीनच्या यानान सुन हिला हरवत तिने ऑलिम्पिकमधील पराभवाचा बदला घेतला. पुढील फेरीत कोरियची युंगजू किम हिला तांत्रिक गुणांच्या आधारे हरवले. उपांत्य फेरीत तिने केवळ ७५ सेकंदांमध्ये विजय मिळवला.
विनेश फोगट हिने २०१४ इंचेऑन आशियाई स्पर्धेत ४८ किलो गटात कांस्यपदक मिळवले होते. आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरण्या-या विनेश हिने सलग दोन स्पर्धात पदकाची कमाई केली. लागोपाठ पदके जिंकणारी ती पहिली महिला कुस्तीपटू आहे. विनेश हिने ग्लासगो आणि गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धातही लागोपाठ सुवर्णपदके मिळवण्याची करामत साधली आहे.
साक्षी मलिककडून निराशा दिवसभरात सलग तिस-या कांस्यपदकाची हुलकावणी
भारताला सोमवारी तीन कांस्यपदकांची भर घालता आली. मात्र तिस-या क्रमांकाच्या लढतीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक हिच्यासह पूजा धांडा आणि पुरुष फ्रीस्टाईल (१२५ किलो गट) सुमीत याचा पराभव झाला. साक्षी ही महिला फ्रीस्टाईल (६२ किलो गट) कोरियाची खेळाडू जॉन्ग सिम रिमकडून २-१२ अशा फरकाने हरली.