घराला गॅलरी असली की ती सजवण्याचा नवा ट्रेंड आला आहे. मग ती कोणाची छोटीशी बेडरूम असते तर कोणाची ड्रॉइंग रूम असते, कोणाची डायनिंग रूम तर कोणाची स्टडी रूमही असते. इतकंच काय पण काही जण या व्हरांडय़ाचं रूपांतर किचनमध्येही करतात. जशी जागा असेल तशी त्या जागेची व्यवस्था केली जाते. पण ही जागा आहे तशीच ठेवून त्या जागेचा सदुपयोग करायचा असेल किंवा या जागेला अधिक आकर्षक करायचं असेल तर का…
लहानशी पारंपरिक बैठक
एल आकारात असलेली एखादी छानशी पारंपरिक बैठक तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. त्यावर छान रंगीत उशा ठेवता येतील. एखाद्या ग्रुपला गप्पा मारायला बसायला याचा चांगला उपयोग होईल. आणि हा कोपरादेखील छान दिसेल.
लाइट्स लावा
एका कोप-यात रंगीत दिव्यांची रोषणाई करा. यामुळे काहीसा फेस्टिव्ह मूड येईल. आजकाल बाजारात विविध आकाराचे छान कंदील मिळतात. त्यांच्या आकारामुळे तुमच्या व्हरांडय़ाला शोभा येईल. किंवा एखाद्या कोप-यात वेगळ्या आकारातले एक-दोन दिवे लावले तरीही खूप छान दिसेल. व्हरांडय़ाला एक वेगळाच लूक येईल.
फुलांची परडी किंवा बाग तयार करा
गॅलरी किंवा व्हरांडा मोठा असो किंवा लहान असो. त्या ठिकाणी तुम्ही हँगिंग झाडं लावली तरीदेखील खूप छान दिसतात. यात शोभेची आणि फुलांची अशी कोणतीही झाडं छान दिसतात. तुमच्या व्हरांडय़ात छान उजेड येत असेल तर चिनी गुलाब, ऑफिस टाइम अशी नाजूक फुलं लावू शकता. याशिवाय तुम्ही ती जागा छोटीशी बाग करू शकता. तुम्हाला हवी असलेली कोणतीही शोभेची झाडं तुम्ही या ठिकाणी लावून त्याची लहानशी बाग करू शकता.
वाइंड चाईम
वाइंड चाईमचा मंजूळ आवाज अतिशय छान येतो. या वाइंड चाईममध्ये लाकडी, मेटल, प्लास्टिक असे विविध प्रकार आहेत. ती तुम्ही व्हरांडय़ात लटकवली तर त्याचा मंजूळ आवाज तुमच्या घरभर येईल आणि प्रसन्न वाटेल.
झोपाळा टांगा
झोपाळा हा सगळ्या वयोगटातीळ लोकांचा सदैव आवडता खेळ. रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी झोपाळ्यावर हेलकावे घ्यायला कोणाला आवडणार नाही. तुमचा व्हरांडा मोठा असेल तर तिथे एक मोठा झोपाळा टांगा. आजकाल वेताचे झोपाळे खूप आहेत. मोठा व्हरांडय़ात लाकडी मोठे झोपाळे आणि त्यावर त्याच आकाराची एक गादी आणि उशा ठेवल्या तरीही खूप छान वाटेल. तिथे बसून एखादा छान झोके घेत पुस्तक वाचेल किंवा गाणी ऐकू शकेल.