घराच्या सुशोभीकरणासाठी रंगसंगती महत्त्वाची ठरते. रूम, हॉल्सच्या भिंतींना कलर करताना दरवर्षी विविध रंगांची निवड करणं महत्त्वाचं ठरतं. काहींसाठी ते उत्साहाचे तर काहींसाठी ते कंटाळवाणे काम वाटते. दरवर्षी भिंती कलर करण्यापेक्षा टाइल्सच्या माध्यमातून भिंती साकारल्या तर दरवर्षी रंगकाम करण्याचे वाचतेच शिवाय टाइल्समुळे घराला येणारी चकाकी, बदलणारं घराचं रूप यामुळे घराला वेगळा लूक येतो आणि टाइल्सनी साकारलेली घरं मनात भरणारी ठरतात.
सर्वसाधारण घरातील किचन, बाथरूमकरिता घर बांधताना टाइल्सचा विचार केला जातो, पण बदलत्या काळानुसार संपूर्ण घर टाइल्सनी साकारली जाण्यासाठी हरतऱ्हेच्या टाइल्सचा वापर होताना दिसतो. बाथरूम, किचन, फ्लोरिंगसाठी, फ्रंट वॉल, लिव्हिंग रूम, हॉल, बेडरूमसाठी वापरण्यात येणा-या टाइल्समध्ये वैविध्य जाणवते. टाइल्सच्या रंगसंगती, प्रकारानुसार त्याच्या किमतीही दिसून येतात.
यामध्ये ब्रीक पॅटर्न, फेस ब्रीक, कोबल स्टोन, की स्टोन, लार्ज टाईल आदी प्रकारे टाइल्सचा वापर करता येतो. वॉल टाइल्स, सिरॅमिक वॉल टाइल्स, डेकोरेटीव्ह वॉल टाइल्स, स्टोन टाईल, फ्लूअर टाईल, स्टोन वॉल टाईल, मेटल वॉल टाइल्स, ग्लास वॉल टाइल्स, लेदर वॉल टाइल्स, मोजाईक वॉल टाईल, ग्लोझी सिरॅमिक वॉल टाईल, सिमेंट टाईल, आदी प्रकारच्या टाईलचा उपयोग होताना दिसून येतो. किचन, बाथरूम, हॉल बरोबरच अलीकडे फ्रंट वॉलसाठीही टाईलचा वापर करून घर सुशोभित केले जाते.
घरातील भिंतींसोबतच घराच्या फ्रंट वॉलना टाइल्स लावून घराची रूपरेषा बदलली जाते. वास्तूचं हे नवं रूप नव्या काळानुसार बदललेलं दिसून येतं. टाईलचा खर्च असला तरी आधुनिक काळाचं टाइल्स रूप नव्याचा वेध घेताना दिसून येतं.