पायी छुमछुमणा-या पैंजणांचा नाद हा मनास लुभावणारा. इवल्याशा लहान मुलींच्या पावलांमध्ये खुळखुळणारे पैंजण म्हणजे पु-या घरामध्ये नादमय वातावरण. ठुमकत चालणारी, दुडदुडणारी ही पावले पैंजणांच्या नादाने घराबरोबरच समारंभ, सोहळय़ातही आपला ठसा उमटवतात.
स्त्रियांच्या दागिन्यांमधील महत्त्वपूर्ण दागिना म्हणजे पैंजण. विशेषत: चांदीमध्ये बनविण्यात येणारे पैंजण आज हौसेखातर सोन्यामध्येही बनविले जातात. तसेच साधे पैंजणांचे प्रकारही पाहायला मिळतात. चांदीबरोबरच, विविध रंगांच्या खडय़ांमध्येही पैंजण साकारून ते रेग्युलर किंवा साडीच्या मॅचिंगनुसार वापरले जातात. लहान मुलींच्या नामकरण विधीला खासकरून पैंजणांचे गिफ्ट दिले जाते. आजही आपल्या पसंतीनुसार पैंजण बनविण्याच्या ऑर्डर देऊन ते गिफ्ट केले जातात. तर मुलगी सासरी जाताना विवाहाच्या वेळी तिला माहेरून पैंजण देण्याची परंपरा आजही दिसून येते.
पैंजणांच्या वेगवेगळय़ा डिझाईन आकर्षक असतात. आपल्याला हव्या त्या स्वरूपात, हव्या त्या खडय़ांमध्ये किंवा केवळ चांदीमध्येही डिझाईन करून ते वापरता येतात. पैंजण हा प्रकार परंपरागत दिसून येतो. अलीकडे फॅशननुसार आणि आवडीनुसार ते वापरले जातात. काही एकेरी साखळीच्या, काही दुहेरी, तिहेरी चांदीच्या पट्टय़ांनी साकारलेल्या डिझाइन्स, तर काही जाड पट्टीच्या, केवळ डिझाइन्सच्या पैंजण तर काही जाड पट्टय़ांचे पैंजण दिसून येतात. काही पैंजणांच्या प्रत्येक सांध्याला घुंगरू बसविलेले दिसतात, तर काही पैंजणांच्या डिझाईनमध्ये केवळ एकाच बाजूला घुंगरांचा समूह बसवलेला दिसून येतो. काही घराण्यांची परंपरा म्हणून कायम पायात पैंजण वापरले जातात. नववधूंच्या पायात सजणारा पैंजणांचा साज, मेंदीच्या रंगात खुलून दिसतो.
पण शाळा, कॉलेजमध्ये जाणा-या मुली आजकाल फारसे पैंजण वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे पूर्वीइतकी पैंजणांची छुमछुम तेवढीशी ऐकायला मिळत नाही. काहीवेळा हौस म्हणून पैंजण वापरले जातात. पैंजणांच्या हरएक डिझाईन्सही बाजारात दिसून येतात. पैंजणांचं हे रूप आजकाल फारसं रेग्युलर राहिलं नसलं तरी, सोहळे समारंभातून एक संस्कृती म्हणून, रीत म्हणून या पैंजणांची खरेदी होताना दिसते आणि ही छूमछूम क्वचितप्रसंगी, तरी ऐकायला मिळते.