देवगड येथे मागील आमसभेच्या ठराव व सूचना पूर्ततेचा घेतला आढावा
देवगड – आमसभेला आलेल्या प्रत्येक नागरिकाने विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्याला मिळाले पाहिजे. त्याची काळजी अधिका-यांनी घ्यावी. नागरिकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देता आले पाहिजे. नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता आमसभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
आमदार राणे यांनी देवगड पंचायत समितीच्या किसान भवनामध्ये मागील आमसभेच्या ठराव व सूचनांच्या पूर्ततेचा आढावा घेतला. यावेळी राणे यांनी अधिका-यांना संपूर्ण तयारीनिशी येण्याच्या सूचना केल्या आहेत.
‘‘नागरी समस्यांशी संबंधित उदाहरणार्थ बीएसएनएल तसेच सार्वजनिक बांधकाम याबाबत समस्या असल्यास, वरिष्ठ अधिकारी मीटिंगसाठी पाठवावेत, अशा सूचना राणे यांनी यावेळी केल्या. मागील आमसभेत आलेल्या प्रत्येक ठरावाचे उत्तर व त्याची कार्यपूर्ती यावर सविस्तर चर्चा या सभेमध्ये करण्यात आली. काही प्रश्न सुटले असून काही न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहेत. तर काही प्रश्नांची उत्तरे आमसभा सभागृहात द्यावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार नितेश राणे यांनी दिल्या आहेत.
गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी नागरिकांची आलेली निवेदने आपण होणा-या आमसभेच्या आधीच अधिका-यांकडे देऊ, आमसभेला येताना त्यांनी या निवेदनाच्या उत्तरासह सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहनही केले. देवगड पंचायत समितीची आमसभा ३० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.