एमपीएलएडीद्वारे जवळपास २० शाळांसाठी निधी मंजूर
मुंबई – राज्यसभेचे नामांकित सदस्य व महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी मुंबईतील शिवडी येथील एका शाळेला बुधवारी भेट दिली. वर्गाचे बांधकाम व सुधारणा यासाठी सचिन यांनी निधी मंजूर केलेल्या सुरुवातीच्या काही शाळांमध्ये गुरू गोविंद सिंग टी स्कूल या शाळेचा समावेश होता. या सुधारणेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. भरपूर अभ्यास करावा व खेळण्यासाठी वेळ काढावा, यासाठी त्यांनी मुलांना प्रोत्साहित केले. भारताचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी एमपीएलएडीद्वारे शालेय व शैक्षणिक संस्था प्रकल्पांना ७.४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
केवळ देशभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठीच नाही, तर सार्वजनिक सेवांसाठीही एमपीएलएडी निधीचा वापर करण्यामध्ये सचिन आघाडीवर आहेत. अनेक शाळा व शैक्षणिक संस्था यांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याबरोबरच सचिन पोलिस विभाग असा विविध सार्वजनिक सेवांनाही पाठिंबा देत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरातील पोलिस प्रशिक्षण संस्थेसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी व पाणीपुरवठा उपकरण देण्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी दिला. शालेय जीवनापासून मुलांच्या सर्वागीण विकासाला चालना देण्यासाठी सचिन प्रयत्न करत आहेत आणि भारतातील दूरवरच्या भागांतही आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देत आहेत.
शालेय व शैक्षणिक संस्था प्रकल्पांना दिलेल्या निधीमध्ये शालेय इमारत, कम्पाऊंड वॉल, ग्रंथालय, प्रयोगशाळा, मुलींसाठी कॉमन रुम, शौचालये, प्रतीक्षा गृह, इ.चे बांधकाम, कम्प्युटरची खरेदी यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये, अहमदनगर येथे गतिमंद मुलांसाठी शाळेचे बांधकाम, केरळमधील कासरागोड जिल्ह्यातील चेरकेला येथील मूकबधीर मुलांच्या शाळेसाठी मल्टिमीडिया क्लासरूम बांधणे व आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील ताय भाषा बोलणा-या विद्यार्थ्यांसाठी होस्टेल बांधणे यांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर यांनी इमारती, प्रयोगशाळा, वर्ग, होस्टेल आदीचे बांधकाम करणे यामार्फत भारतातील दूरवरच्या भागांतील शाळा व कॉलेजांसाठी निधी मंजूर केला आहे.