पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी घोटाळा केला असून या घोटाळ्यात दानवेही सहभागी आहेत, असा थेट आरोप ‘आप’ने केला आहे.
मुंबई- आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी भाजपच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यश रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी घोटाळा केला असून या घोटाळ्यात दानवेही सहभागी आहेत, असा थेट आरोप प्रीती शर्मा-मेनन यांनी केला आहे. याप्रकरणी पंकजा मुंडेचा तत्काळ राजीनामा घेण्याची मागणीही ‘आप’ने केली आहे.
बालविकास सेवा (आयसीडीएस) माध्यमात पोषण सर्व पुरवठा ठेकेदारांकडून नव्हे, तर ग्रामीण समुदाय, स्वयंसहाय्य गट व महिला गटाकडून करण्यात यावा. असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. मात्र, या आदेशाला हरताळ फासत पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांनी खासगी ठेकेदारांना ही कामे दिली, असा आरोप मेनन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांनी ७७७ कोटी रुपयांमधील ८८ टक्के कंत्राटे वेंकटेश्वर महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था लिमिटेड, महालक्ष्मी महिला गृहउद्योग आणि बाल विकास बहुउद्देशीय औद्योगिक सहकारी संस्था आणि महाराष्ट्र महिला सहकारी गृहउद्योग संस्था लिमिटेड या तीन फसवणुकीचे आरोपच नव्हे तर प्रत्यक्ष पुरावे असलेल्या संस्थांना वाटून दिली, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
जालन्यातील मोरेश्वर बँकेच्या बँकेकडून ५ लाख रूपयांचे व्यवहार झाले आहेत ते एका आर. डी. दानवे यांच्या नावे आहेत. हे आर. डी. दानवे म्हणजेच रावसाहेब दानवे का, असा सवाल ‘आप’ने विचारला आहे.
भाजपने काँग्रेसच्या भयानक घोटाळ्याची पुनरावृत्ती केली आहे. कारण आता पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांचे जवळचे संबंध असलेल्या कंत्राटदारांशी हातमिळवणी आहे, असेही मेनन यांनी सांगितले.
चौकशी करा.हाकला यांना.संधी आहे …