सहय़ाद्रीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे कृषिप्रधान गाव म्हणून करंजे गावाची ओळख आहे. कारण येथे शेती व फळ लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते.
कणकवली – सहय़ाद्रीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे कृषिप्रधान गाव म्हणून करंजे गावाची ओळख आहे. कारण येथे शेती व फळ लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. श्रीदेवलिंग रवळनाथ हे करंजे गावचे जागृत ग्रामदैवत आहे. श्रीदेवलिंग रवळनाथाचा देवदिवाळी हा वार्षिक जत्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या उत्सवाला दीपोत्सव असेही म्हणतात.
श्रीदेव लिंगेश्वर, श्रीदेवी सातेरी, श्रीदेव गांगो, श्रीदेव ब्राह्मण, श्रीपालकेश्वर, श्रीमारुती मंदिर ही गावातील प्रमुख देवस्थाने आहेत. तसेच बौद्ध समाजाचे बुद्धविहारही येथे आहे. करंजे गावाच्या निसर्गरम्य वनराईमध्ये श्रीपालकेश्वर हे जागृत स्थळ आहे. गावाच्या डोंगररांगांत उंच ठिकाणी श्रीपालकेश्वराचे स्थळ असल्यामुळे करंजे गावातील सर्व लोकांवर पालकेश्वराची कृपादृष्टी आहे, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. गावातील लोक पालकेश्वराची पूजाअर्चा करतात. त्यामुळे भाविकांना आध्यात्मिक आनंद मिळतो. श्रीपालकेश्वर या धार्मिक स्थळाचा पर्यटनदृष्टय़ा विकास झाल्यास हे ठिकाण नावारूपास येईल. करंजे गावातील सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुरू करण्यासाठी ग्रामसचिवालय इमारतीचे बांधकाम करण्याचे मंजूर करण्यात आले आहे. इमारतीसाठी सरकारकडून १० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. येत्या वर्षभरात ग्रामसचिवालयाची सुसज्ज इमारत उभी राहणार आहे.
गावात आरोग्य उपकेंद्रासाठी जि. प. सदस्य सतीश सावंत प्रयत्नशील आहेत. त्यामुळे गावातील जनतेला आरोग्याच्या सर्व सोयीसुविधा गावातच मिळणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे गावात अनेक विकासकामे झाली आहेत. सर्व ग्रामस्थ गावाच्या विकास प्रक्रियेत सामील झाल्यामुळे ग्रामपंचायतीला २०११मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, २००८मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. सरपंच अश्विनी जाधव, उपसरपंच मंगेश तळगावकर, सदस्य डॉमनिक झुजे रॉड्रिक्स, सुरेश घोणे, विठ्ठल काणेकर, विजया गायकवाड, सुहासिनी चिंदरकर, ग्रामसेवक एस. जी. चव्हाण यांच्या सहकार्यातून अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत.
करंजे गावात आसरोंडकरवाडी-सोनारवाडी, आपटेवाडी, तेलीवाडी, शिरसाटवाडी, गावठणवाडी, साटमवाडी, नारकरवाडी, सातवसेवाडी, बौद्धवाडी, मळयेवाडी, टेंबवाडी, कुंभारवाडी-रोहिदासवाडी अशा १२ वाडय़ा आहेत. गावात ग्रामपंचायत सदस्य नऊ असून नऊ नळयोजना, १४ बोअरवेल व ३८९ नळकनेक्शन व ५३९ घरे, तर सार्वजनिक विहिरी २२ आहेत. १० बचतगट, चार प्राथमिक शाळा, एक माध्यमिक विद्यालय (माध्यमिक हायस्कूल आदर्श विद्यालय करंजे), एक मतिमंद विद्यालय (श्रीराजर्षी शाहू महाराज मतिमंद निवासी विद्यालय, करंजे) व तीन अंगणवाडय़ा असून गावात तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस यांच्यासहित आरोग्य उपकेंद्र आहे.
करंजे कुंभारवाडीतील कुंभार बांधव आपली पारंपरिक कुंभारकला जोपासत आहेत. वाढत्या महागाईमुळे मातीची भांडी तयार करण्यासाठी बाहेरून माती आणावी लागत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मातीच्या भांडय़ांना पूर्वीसारखी मोठय़ा प्रमाणात मागणी नाही. मात्र, लोकांना धार्मिक कार्यासाठी व इतर कामांसाठी आवश्यक असणारी भांडी तयार करून दिली जातात. तसेच माठ, घागर, सौरचूल, पातेले, कुंडी, चुली, पणत्या आदी वस्तूही मागणीनुसार बनवल्या जातात.
दृष्टिक्षेपात करंजे..
लोकसंख्या : १,७७२
वाडय़ा : १२
गावचे क्षेत्रफळ : १३९५.५५.७५ हेक्टर आर.
नरडवे धारण केवा पूर्ण होणार आम्हा गाव्कार्येना नरडवे धारचे पाणी केवा मिळणार
नरडवे धारण केवा पूर्ण होणार आम्हा गाव्कार्येना नरडवे धारचे पाणी केवा मिळणार
अनंत रामचंद्र चव्हान