ग्रीक पंतप्रधान अॅलेक्सिस सिप्रास यांच्याकडून शेवटच्या क्षणी बेल-आऊट प्रस्ताव स्वीकारण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त बाजाराला मंगळवारी दिलासा देणारे ठरले.
मुंबई- ग्रीक पंतप्रधान अॅलेक्सिस सिप्रास यांच्याकडून शेवटच्या क्षणी बेल-आऊट प्रस्ताव स्वीकारण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त बाजाराला मंगळवारी दिलासा देणारे ठरले. यातच आशिया बाजारांतूनही सकारात्मक संकेत मिळाल्याने सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३६ अंकांच्या वाढीसह २७,७८०.८३वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ५०.१० अंकांची वाढ होऊन हा निर्देशांक ८,३६८.५० वर बंद झाला.
एफएमसीजी, आरोग्यसेवा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि धातू या क्षेत्रातील शेअरची खालच्या स्तरावर गुंतवणूकदारांनी खरेदी केली. युरोपीयन कमिशनचा आर्थिक मदतीचा प्रस्ताव शेवटच्या क्षणी स्वीकारण्याचा ग्रीक पंतप्रधान अॅलेक्सिस सिप्रास यांच्याकडून विचार सुरू असल्याच्या वृत्ताने बाजारातील नूर पालटला. दोन सत्रात २५०.८२ अंकांची घट नोंदवणा-या सेन्सेक्सने सुरुवात घसरणीसह केली होती.
स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअरनाही किरकोळ गुंतवणूकदारांकडून नव्याने मागणी वाढून या निर्देशांकांत अनुक्रमे १.०७ टक्के आणि १.३३ टक्के वाढ झाली. आशियाई बाजारातही तेजी होती. चीनच्या शांघाय कॉम्पॉझिटमध्ये ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. यातून कमबॅक करत हा बाजार सावरला. तर हाँगकाँग, तायवान, जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया यांचे बाजार ०.६३ टक्के ते १.०९ टक्क्यांपर्यंत वधारले. दरम्यान, युरोपीय बाजारात मात्र सावध पवित्रा होता.
I could watch Scriedlnh’s List and still be happy after reading this.