चर्चगेट स्थानकात रविवारी भाईंदर-चर्चगेट लोकल ताशी २९ किलोमीटर वेगाने बफरला धडकून थेट प्लॅटफॉर्मवर चढली.
मुंबई- प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आलेली लोकल.. अशी उद्घोषणा ऐकल्याशिवाय मुंबईकरांचा एकही दिवस जात नाही. मात्र रविवारी सकाळी ही घोषणा विचित्र प्रकारे प्रत्यक्षात आली. चर्चगेट स्थानकात आलेली भाईंदर-चर्चगेट लोकल ताशी २९ किलोमीटर वेगाने बफरला धडकून थेट प्लॅटफॉर्मवर चढली आणि एकच हलकल्लोळ माजला.
सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी चर्चगेट स्थानकात आलेली लोकल थांबण्याऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील बफरला धडकली आणि पुढचा डब्बा अनेक फूट हवेत उडून थेट प्लॅटफॉर्मवर आला. सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाले नसून पाच जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
प्रचंड आवाजासह झालेली ही धडक इतकी जोरात बसली की, लोकलचा पहिला महिलांचा डब्बा हवेत उडाला. यात तीन डब्यांचे माठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर चर्चगेट स्थानकातील जलद मार्गाचे दोन्ही फलाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काही काळ ‘स्लो ट्रॅक’वर आली होती. तर सुमारे ७० हून अधिक गाडय़ा या अपघातामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. सुदैवाने हा अपघात रविवारी घडल्याने लोकलमध्ये गर्दी नव्हती. अन्यथा या अपघातात मोठी हानी झाली असती. दरम्यान, अपघातानंतर बंद करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्म तीनची सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्ती सुरू होती.
मोटरमनने केले कॉल रेकॉर्ड डिलिट
दरम्यान, हा अपघात मानवी चुकांमुळे झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असून मोटरमनकडील मोबाईल फोनची तपासणी केली असता सर्व कॉल डिलिट करण्यात आल्याने शंका उपस्थित होत आहे, असे सुनीलकुमार सुद यांनी सांगितले आहे. याची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
तीन जण निलंबित
या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून लोकलचा मोटरमन एल. एस. तिवारी, गार्ड अजय गोहिल व लोको निरीक्षक एम. जी. वर्मा यांना निलंबित केले आहे, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी सांगितले.
भाजप सरकारचा निषेद करायला विरोधकांना अजून एक कारण मिळाले.