फेसबुक मैत्रिणीवर विश्वास ठेवणे पुण्यातील एका इंजिनिअरला चांगलेच महागात पडले आहे.
पुणे- फेसबुक मैत्रिणीवर विश्वास ठेवणे पुण्यातील एका इंजिनिअरला चांगलेच महागात पडले आहे. चक्क त्याच्याच मैत्रिणीने ११ लाख रुपयांना फसविले आहे.
पुण्यातील एका कंपनीतील आयटी इंजिनिअरची फेसबूकवर एका मुलीशी मैत्री झाली. सँड्रा रॉबिन्सन असे या तरुणीचे नाव असून ती लंडनमध्ये राहत होती. हळूहळू त्या दोघांची मैत्री बहरू लागली. त्यानंतर त्या दोघांनी आपले मोबाईल नंबर एकमेकांना दिले. चॅटींग सुरू असतांनाच आता कॉलही सुरू झाले होते. मला भारतात यायचे आहे, भारतात स्थायिक व्हायचे आहे, त्यासाठी मदत करण्याची विनंती ती इंजिनिअरला करत होती.
एकदिवस त्या तरुणीने आपण भारतात आल्याचे सांगितले पण आपल्याला कस्टम अधिका-यांना पकडल्याचे सांगितले. त्यानंतर त्या इंजिनिअरला कस्टम विभागातून फोन आला. तुमची मैत्री सँड्रा दिल्लीत आली असून तिचे यलो कार्ड हरवल्याचे त्या कस्टम अधिका-याने सांगितले. तसेच तिच्याकडे दोन अॅपल मोबाईल, दोन लॅपटॉप, हिऱ्याचे दागिने, ४७ हजार पौंड असा ऐवज मिळाला आहे. सॅँड्राला ताब्यात घेतले असून सुटका करायची असल्यास दंड भरावा लागतील, असे त्या अधिका-याने इंजिनिअरला सांगितले.
आयटी इंजिनिअरने तिच्याशी बोलल्याशिवाय पैसे भरणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना फेसबुक मैत्रिणीचा फोन आला. तिने कस्टमच्या अधिका-यांनी पकडल्याचे सांगितले आणि मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांने मदतीपोटी जवळपास ११ लाख रुपये बनावट कस्टमच्या अधिका-यांनी दिलेल्या बँकेच्या खात्यावर काही रक्कम भरली. त्यानंतर दुस-या क्रमांकवरून फोन आल्यानंतर दुसरे कारण सांगितले.
तीन वेळा फोन करून त्यांच्याकडून ११ लाख ४३ हजार रुपये विविध खात्यावर मागवून घेतले. त्यानंतर त्या इंजिनिअरने फेसबूक मैत्रिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याचे लक्षात आले. याबाबात त्या आयटी इंजिनिअरने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून सँड्रा या तरुणीसह इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अरे.. हा आय टी इंजिनीअर एकदमच भोंद्या निघाला!