यंदाची दिवाळी थोडी वेगळी आहे… खरं म्हणजे यावेळी पाच दिवसांची मोठी दिवाळी एन्जॉय करायला मिळणार आहे…
नवीन वर्षाच्या गिफ्टसाठी दिवाळीत काम
गेल्या काही वर्षात दिवाळीच्या आसपास प्रदर्शित सिनेमे प्रेक्षकांना आवडले आणि त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळाला. मात्र यंदाची दिवाळी थोडी वेगळी आहे. या दिवाळीत आम्ही प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाच्या गिफ्टची तयारी करतोय. अर्थात गुरु सिनेमाबद्दल सगळ्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. पण त्याच्यासाठी थोडं थांबावं लागेल. माझी दरवर्षीची दिवाळी माझं घरतील कुटुंब आणि प्रेक्षकांसोबत साजरी होते पण यावेळी अंकुश चौधरी, उर्मिला कानिटकर, मी आणि सिनेमाची संपूर्ण टीम सेटवरच दिवाळी साजरी करणार दिग्दर्शक, निर्माता – संजय जाधव
यंदाची दिवाळी खुप स्पेशल
मी आजही दिवाळीच्या सणाची खूप आतुरतेने वाट पाहतेय. खरं म्हणजे यावेळी पाच दिवसांची मोठी दिवाळी एन्जॉय करायला मिळणार आहे. असा हा अतिशय लाडका सण आहे ज्यावेळी मी आवर्जून घरच्यांसोबत रहाते. त्यासाठी शक्यतो ‘दिवाळी पहाट’ चे कार्यक्रम देखील टाळते. दिवाळीची तयारी, फराळ करते. त्यातही यंदाची दिवाळी माझ्यासाठी स्पेशल आहे. निर्मिती क्षेत्रातील पदार्पण आणि प्रदर्शित होऊ घातलेला ‘फोटोकॉपी’ सिनेमा माझ्यासाठी बोनसच म्हणावा लागेल. त्यातील पिपाणी हे गाणं या सणाच्या निमित्ताने लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच ते अनेक म्युझिक वाहिन्यांवर गाजेल. निर्माती, गायिका – नेहा राजपाल
दिवाळी आणि फॅमिली
यावर्षी तब्बल १० वर्षांनंतर मी स्वतःच्या घरी आणि घरच्यांसोबत दिवाळी सेलिब्रेट करणार आहे. आई – बाबा, ताई – जीजू कम्प्लीट फॅमिली असणार आहे. गेल्या काही वर्षात सिनेमाच्या चित्रिकरणामुळे हा सण माझा चुकत होता मात्र यंदा नो वे!… त्यांनतर आम्ही सगळ्यांनी कश्मीरला जाण्याचा देखील प्लान केलाय. माझ्यासाठी ही दिवाळी जशी स्पेशल आहे तसंच येणारं वर्ष देखील खूप स्पेशल असणार आहे. वर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणारा मि. अॅण्ड मिसेस सदाचारी सिनेमात एका वेगळ्याच भूमिकेत मी प्रेक्षकांना पहायला मिळेल. अभिनेत्री – प्रार्थना बेहरे
दिवाळीची मज्जा आणि काहीशी प्रतीक्षा
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात एखाद्या सोहळ्या रुपात यंदाचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी दिवाळी पहाटचे कार्यक्रम होत असले तरीही बाप्पाच्या सानिध्यात होत असलेल्या कार्यक्रमात गाण्याची संधी माझ्यासाठी स्पेशल आहे. दिवाळीचा पारंपारिक फराळ असला तरीही एखाद्या वेगळ्या पदार्थाची फार्माईश असतेच म्हणूनच यावेळी फराळ अधिक काजू रोल आणि मटार सामोसे यांची खास मेजवानी असणार आहे. आम्ही घरची सगळी मंडळी घरी एकत्र सण साजरा करतो. त्यातही आमच्याकडे चोपडी पूजनाची प्रथा असल्यामुळे मी आणि माझी जाऊ दोघी न चुकता लक्ष्मी पूजनासाठी त्यावर स्वस्तिक आणि लक्ष्मीचं फोटो रंगवून त्याची पूजा करतो. हे वर्ष नक्कीच माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं असं म्हणायला हरकत नाही. यात येत्या वर्षात येणाऱ्या माझ्या अल्बमची तयारी आणि मुंबई टाईम या प्रदर्शित होणा-या सिनेमाची प्रतीक्षा करतेय. त्या सिनेमासाठी मी संगीत दिग्दर्शिका म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यातील गाणी देखील प्रेक्षकांना नक्की आवडतील अशी आशा आहे. गायिका – योगिता चितळे
सगळ्यांना खूप खूप खूप शुभेच्छा.