परसात फुललेल्या गुलाबाच्या फुलांपासून प्रेरणा घेत गुलाब शेती करण्याची कल्पना अमरावतीतील हेमलता पवार यांना सुचली. ही कल्पना त्यांनी आपले पती अरुण पवार यांच्याकडे मांडली. गुलाबांना बाजारात असलेली मागणी आणि भाव पाहता ही कल्पना त्यांना खूपच आवडली आणि लगेचच त्याला होकार दिला. या कल्पनेतूनच अमरावतीपासून पाच किलोमीटर अंतरावर निभोरा येथे मनमोहक गुलाबशेती उभी राहिली असून परसातील एका झाडापासून पाच हजार झाडे उभी करण्याची किमया या दाम्पत्याने लीलया साधली आहे. त्यांना दररोज दोन हजारांपर्यंत उत्पन्न यातून मिळत आहे. या शेतीतून प्रेरणा घेऊन पारंपरिक शेती करणारे फुलशेतीसारख्या अपारंपरिक शेतीकडे वळतील, असा विश्वास या दाम्पत्याने व्यक्त केला.
अमरावती येथील पवार दाम्पत्याने देशी गुलाबासह विविध संकरित जातीच्या गुलाबांची या शेतीमध्ये लागवड केली आहे. आधुनिक पद्धतीने त्यांनी ही गुलाबाची शेती फुलवली आहे. नियोजनबद्ध मशागत आणि आधुनिक पद्धतीची लागवड यामुळे दर्जेदार गुलाबाचे पीक त्यांना मिळत आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर गुलाबांची ते दररोज तोडणी करत असून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. बाजारात त्यांच्या शेतातून दररोज दोन ते अडीच हजार फुले विकली जात आहेत.
एका फुलाला एक रुपयाचा बाजारभाव मिळत असून रोजचे दोन ते अडीच हजारांचे उत्पन्न त्यांच्या हाती पडत आहेत. गुलाबाला बाजारात मोठी मागणी आहे. पुष्पगुच्छांमध्ये याचा सर्वाधिक वापर होतो. तसेच महिलांकडूनही मोठी मागणी असते. त्यामुळे बाजार तयार करण्यासाठी या दाम्पत्याला विशेष कष्ट घ्यावे लागलेले नाहीत. अमरावतीचा फुलबाजार हेच त्यांचे विक्रीची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे बाहेरगावी फुले पाठवण्यासाठी उरतच नाहीत. त्यामुळे वेळेचीही मोठी बचत होत असल्याचे या दाम्पत्याने सांगितले. त्यामुळे मार्केट शोधणे, वाहतूक व्यवस्था ही कटकट त्यांना भासत नाही. फुलशेतीतून त्यांना चांगला स्वयंरोजगाराचे साधन मिळाले आहे. या फुलशेतीतून त्यांनी चांगला स्वयंरोजगार उभा केला आहे.
अमरावती शहरालगत निंभोरा येथे पवार कुटुंबीयांची पाच एकर शेती आहे. १९९५मध्ये त्यांनी ही शेती विकत घेतली होती. शेतात असलेल्या घरासमोर एक देशी गुलाबाचे झाड होते. या झाडाला दररोज तीस ते चाळीस फुले लागत होती. देवाला पाच फुले वाहिल्यानंतर उरलेल्या फुलांचे करायचे काय, असा या दाम्पत्याला प्रश्न पडत असे. यातूनच हेमलता पवार यांना एक कल्पना सुचली. त्यांनी उरलेली फुले परिचित फुले विक्रेत्याला विकण्यास सुरुवात केली. यातून त्यांना दररोज पंधरा ते वीस रुपये मिळू लागले. या उत्पन्नामुळे प्रेरित होऊन हेमलता यांनी व्यावसायिक पातळीवर गुलाबशेती करण्याचा विचार अरुण पवार यांच्याकडे मांडला. त्यांनी तो ताबडतोब मान्य केला. अरुण पवार हे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात.
उपलब्ध असलेल्या गुलाबाच्या झाडापासून कलम तयार करून त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड व मशागत केली. आज या कुटुंबाला दररोज दोन हजार रुपये नफा मिळतो. देशी गुलाबानंतर आता पवारांनी विविध जाती आणि रंगांच्या गुलाबांची लागवड केली आहे. त्यांची मशागत अत्याधुनिक पद्धतीने ते करतात. झाडांना आवश्यक असणारे खत, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि पाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ते पुरवतात. यामुळे पाण्याची बचत होते आणि खर्चातही मोठी बचत होते.
पवार यांच्या शेतात आजमितीला ३५०० गुलाबांची झाडे आहेत. पाच एकरापैकी दोन एकरांत त्यांनी शिर्डी गुलाबाची लागवड केली आहे. या गुलाबाला बाजारात खूप मागणी आणि भाव आहे. गुलाबासोबत आता झेंडू आणि ग्लॅडियर लावण्याची त्यांची योजना आहे. सौभाग्यवतीला सुचलेली कल्पना आणि त्याचा आज झालेला विस्तार प्रेरणादायी आहे. केवळ एका गुलाबाच्या झाडापासून हजार झाडांपर्यंत मजल मारण्याचा त्यांचा प्रयत्न आणि मिळालेले यश इतरांना बरेच काही सांगून जाणारे आहे. आज अनेक शेतकरी त्यांच्या गुलाबशेतीला भेट देऊन माहिती घेत आहेत. या शेतीविषयी हे दाम्पत्य त्यांना आनंदाने माहिती देत आहेत.
परसातील एका झाडापासून गुलाबाची लागवड करण्याची कल्पना सुचली. आजच्या घडीला ३५०० गुलाबाच्या झाडांची लागवड केली असून दरदिवशी दोन ते अडीच हजार गुलाबांची विक्री केली जात आहे. शेतकरी फुलशेतीकडे वळल्यास त्यांना नक्कीच जास्तीचे उत्पन्न मिळेल. – हेमलता पवार, शेतकरी
सर मला पण गुलाब लागवड करायची आहे, तर लागवडीसाठी रोप लागतात हे कोणी सांगू शकेल का? अधिक माहिती कोणाकडे भेटेल…