आजकाल मध्यमवर्गीयांना मोठं घर घेणं परवडत नसल्याने छोटय़ा घरांचा पर्याय त्यांना स्वीकारावा लागत आहे. अशा घराची सजावट करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी एखाद्या तज्ज्ञांचा सल्लाही आपल्याला घेता येईल. पण तो घेतला नाही तरी काही छोटया छोटया गोष्टी पाळल्या तर लहान घरातही अंतर्गत सजावट आपल्याला कल्पकतेने करता येऊ शकते.
शहरांमध्ये जागेचा प्रश्न बिकट बनला आहे. मध्यमवर्गीयांना मोठं घर घेणं अवघड बनल्यामुळे लहान घराचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. मात्र लहान घरातही कल्पकतेने फर्निचर आणि वस्तूंची मांडणी केली तर तेही तेवढंच सुबक आणि आकर्षक दिसू शकतं. शहरांमध्ये नोकरीपेक्षाही अधिक मोठी समस्या घरांची बनली आहे. जागेच्या किमती भरमसाट वाढल्यामुळे लहान जागेतच राहून संतुष्ट राहावं लागत आहे. गरजेचं सामान लहान घरात कुठे आणि कसं ठेवायचं हा प्रश्न गृहिणींसमोर आ वासून उभा असतो. मात्र घर लहान असलं तरी निराश होण्याची मुळीच गरज नाही. छोटया घरालाही तुम्ही आकर्षक, सुंदर आणि सुसज्ज नक्कीच बनवू शकता.
अलीकडे भिंतीतील कपाटं बहुतेक नसतातच. मात्र त्याला पर्याय म्हणून इनबिल्ट स्टोरेजचा वापर करता येईल. घराला लॉफ्ट करून तिथे कप्पे बनवून घ्यावेत. त्यात खूप सारं सामान बसू शकतं. तसंच हॉल किचनमधील भिंतीऐवजी तिथे दोन्ही भाग स्वतंत्र करणारं मोठं शेल्फ बनवून घ्यावं. त्यात एका बाजूने किचनमधील सामानांसाठी कपाटे करावीत तर दुस-या बाजूने टीव्ही, डीव्हीडी स्पीकर ठेवण्याची व्यवस्था करावी. अशीच कॉमन वॉल बेडरूमच्या भिंतीशीही करता येईल. वॉर्डरोब तसंच स्टडी टेबल, शेल्फ, ड्रॉव्हर यापैकी काही गोष्टी त्यामध्ये नक्कीच करता येतील. तसंच वॉर्डरोबच्या वरच्या बाजूने म्हणजे छतापासूनच स्टोरेजला जागा करून घ्यावी. त्यात जास्तीचं सामान सहज बसवता येईल. कुठलंही फर्निचर करताना मात्र घराची रचना लक्षात घेणं आवश्यक आहे. कुठलीही वस्तू घेताना ती विनाकारण जागा अडवणारी आहे का, याचा विचार जरूर करावा. वस्तू घेतानाच तिचा स्टोरेज म्हणून सजावटीसाठीही असा दुहेरी उपयोग होईल, याचा विचार नक्की करावा.
बहुमुखी प्रकारचं कॅबिनेट लहान घरात उपयोगी ठरतं. हे कॅबिनेट गरजेनुसार कुठेही ठेवता येतात. तसंच बेडही बॉक्सवाला असावा. त्याच्यामध्येही बरंच सामान मावतं. बेडरूम एकच असल्यास हॉलमध्ये नुसत्या सोफ्याऐवजी सोफा कम बेड ठेवावा. ‘टू इन वन’ प्रकारचं फर्निचर लहान घरात खूप उपयोगी ठरतं. अलीकडे एकाच वस्तूचे अनेक उपयोग करता येतील, असे प्रकार बाजारात दिसून येतात. सोफा कम बेडही त्यातीलच एक पर्याय आहे. गरज वाटेल तेव्हा म्हणजे पाहुणे घरात आले की, सोफा आणि इतर वेळेस सोफ्याचाच बेड बनवून घ्यावा. यामुळे जागा कमी लागते. यामध्ये निरनिराळ्या डिझाइनचे तसंच पाहिजे त्या किमतीतले सोफा कम बेड मिळतात.
आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार त्याची निवड करता येते. किचन लहान असल्यास ओटय़ाखाली आणि एखाद्या मोकळ्या भिंतीशी स्टोरेज करावं. दुस-या एका भिंतीला जाड फोल्डिंगची फळी बसवावी. त्यावर सनमायका लावला की ती आकर्षक दिसते. तिचा वापर गरजेच्या वेळी टेबल म्हणून करता येईल. गरज नसल्यास हुक काढून भिंतीलगत ठेवता येईल. त्यामुळे टेबलाची जागा अडणार नाही. यासाठी बसायच्या खुर्च्याही फोल्डिंगच्याच वापराव्यात. गॅलरीचाही उपयोग स्टोरेजसाठी किंवा अन्य कामासाठी करता येतो. गॅलरीला हाफ स्लायडिंग लावून आणि त्यावर फिकट रंगाचे आकर्षक पडदे लावून एक छोटीशी खोलीवजा जागा बनवता येईल. तिथे एखादा कोपरा, मुलांच्या अभ्यासाचे टेबल, शेल्फ, संगणक असं बरंच काही ठेवता येईल. स्लायडिंग असल्याने हवाही खेळती राहील. स्लायडिंगच्या बाहेरून मात्र लोखंडाची जाळी नक्की बसवून घ्यावी, म्हणजे गॅलरी सुरक्षित होईल.
हल्ली फोल्डिंगचे भिंतीला फीट बसणारे शू-रॅक मिळतात. अगदी कमी जागा ते व्यापतात. दाराच्या मागेही अशी शू-रॅक आपण बसवू शकतो. ती फारशी महागही नसते. लहान घर सजवताना आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. कुठली वस्तू फार मोठया आकाराची आणू नये. उदा. सोफा, टिपॉय, शू-रॅक इत्यादी वस्तू मर्यादित आकारातच आणाव्यात. अन्यथा घराचा बराचसा भाग या वस्तूंनीच व्यापला जातो आणि त्यामुळे माणसांना घरात वावरताना अडचण होते.
काही सोप्या युक्त्या वापरता येतील. उदा. संगणक टेबलावर आणि खाली मुलांची पुस्तके ठेवण्यासाठी जागा बनवून घ्यावी. म्हणजे वेगळे स्टडी टेबल घेण्याची गरज पडत नाही. आणखी महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे, एखादी वस्तू आवडली की लगेच खरेदी करण्याचा मोह आवरावा. घरातील टाकाऊ वस्तू वेळच्या वेळी बाहेर टाकाव्यात. म्हणजे घरात अडगळ साठत नाही. जुने कपडे, जुन्या चप्पल वगैरे सामान सतत काढत राहावं म्हणजे घरात नेमकंच सामान राहतं आणि घर नेटकं दिसतं. अशा काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर घर छोटं असलं तरी त्यामध्ये अधिक सजावट करता येईल.
आपली माहिती चांगली वाटली पण असे कमी जागेत मावणारे फर्निचर कोठे मिळेल आणि त्याचा खर्च किती येईल याची माहिती हवी आहे तसेच कमी खर्चात कामं करणार कारपेंतर कोठे मिळेल त्याच फोन नंबर पत्ता पाहिजे तसेच ४९५ स्क्वेअर फुट फ्लेत मध्ये फर्निचर योज्बा कशी करावी याचे माहिती पुस्तक असल्यास एमैल करावा आभारी होऊ