मुंबईत हक्काचे परवडणारे घर मिळावे याचे स्वप्न पाहणा-या गिरणी कामगारांची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही.
मुंबई- मुंबईत हक्काचे परवडणारे घर मिळावे याचे स्वप्न पाहणा-या गिरणी कामगारांची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही. म्हाडाद्वारे काढण्यात आलेल्या पहिल्या टप्प्याच्या सोडतीतील प्रतीक्षा यादीवरील गिरणी कामगारांना घरे देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने म्हाडा सांगत असले तरी प्रत्यक्ष प्रक्रिया ‘मिळणार’ ‘देणार’ अशा शाब्दिक घोळात अडकली आहे.
प्रतीक्षा यादीतील कामगारांना संधी देण्यास परवानगी मिळाली असून येत्या दोन महिन्यात ही प्रक्रिया सुरूकरण्याचे विचाराधीन असल्याचे म्हाडाच्या अधिका-यांनी सांगितले. २०१२ साली म्हाडाद्वारे ६ हजार ९२५ घरांसाठीची सोडत काढली.
साडेपाच हजारहून अधिक विजेत्या कामगारांना घरांचे वितरण झाले. मात्र तीन वर्षे उलटले तरी काही कामगारांना अद्यापही घरांचे वितरण झालेले नाही. ६००हून अधिक विजेत्या कामगारांनी पात्रता निश्चितीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रं अद्यापही सादर केली नव्हती. ती सादर करण्यासाठी म्हाडाद्वारे वारंवार आवाहन करण्यात आले होते.
१५ जून ही कागदपत्रं सादर करण्याची अंतिम तारीख होती. त्याला २० ते २५ कामगारांनी प्रतिसाद दिला. मुदतवाढ देऊनही कागदपत्रे सादर न केलेल्या अर्जदारांना अपात्र करत प्रतीक्षा यादीवरील कामगारांना संधी देण्याचे म्हाडाने ठरवले. ही प्रक्रिया सुरूकरण्याच्या परवानगीसाठी जूनमध्ये म्हाडाने राज्य सरकारला पत्र पाठवले होते. प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना संधी देण्याची परवानगी मिळाली आहे.
पहिल्या टप्प्यातील कामगारांच्या वितरण प्रक्रियेवर सध्या काम सुरू आहे. कालांतराने प्रतीक्षा यादीही कार्यान्वित करण्यात येईल. त्याला दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे म्हाडाच्या अधिका-यांनी सांगितले. प्रक्रिया कार्यान्वित केल्यानंतर प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना पत्रही पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी देणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील सोडतीत कामगारांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेत, घरांच्या वितरण प्रक्रियेत प्रचंड दिरंगाई झाली आहे. हे लक्षात घेता प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांच्या घरांच्या प्रक्रियेबाबत लवकरात लवकर सुरुवात करत त्यांना घरांचे वितरण करावे.
– दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेते
म्हाडाने नियमाप्रमाणे विजेत्यांबरोबरच प्रतीक्षा यादीही जाहीर केली होती. प्रतीक्षा यादीतही डबल
सदनिका लागलेले, वारसांना डबल सदनिका लागलेले गिरणी कामगार आहेत. प्रतीक्षा यादी प्रसिद्ध
करण्यापूर्वी योग्य तो विचार करून सोडतीत डबल सदनिका लागलेले, वारसांना डबल सदनिका लागलेले, १/१/१९८२ पूर्वीचे गिरणी कामगार, बोगस ज्यांच्याकडे एकही पुरावा नसलेले, कामगारांनी एकापेक्षा अधिक गिरण्यांमध्ये काम केल्याने त्यांनी दोन अर्ज केल्यामुळे दोन सदनिका लागलेले. कामगारांनी काम केलेल्या जागेच्या ठिकाणी अर्ज भरावयाचे असताना चुकीच्या संकेत क्रमांकावर अर्ज भरुन सदनिका लागलेले, गिरणीच्या जमिनीवरील चाळीत मोफत घर मिळालेले/ नुकसान भरपाई मिळालेले अशा अपात्र गिरणी कामगारांना रद्द करुन अदयावत (updated) अशी प्रतीक्षा यादी जाहीर करण्याची विनंती आहे. जेणेकरुन घरांच्या वितरण प्रक्रियेत दिरंगाई होणार नाही.