पेण – काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पेण तालुक्यातील विविध चित्रशाळांमध्ये बाप्पा आकार घेऊ लागले असून, रंगकामास सुरुवात झाली आहे.
पेणमधील गणेशमूर्ती परराज्यासह सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत. मूर्ती तयार करण्यातील सुबकता आणि आकर्षक रंगसंगती, कारखानदार, कलाकार, कारागिरांचे अविरत कष्ट, त्यांची चिकाटी, प्रामाणिकपणा, नवे काही देण्याचा प्रयत्न, कुशलता या सा-या बाबी कारणीभूत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या वर्षी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशससह परदेशात १२ ते १४ हजार गणेशमूर्ती पाठवण्यात आल्या आहेत.
गणेशमूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणा-या पेणमधून या वर्षी जवळपास ३० लाख गणेशमूर्ती देशभरात पाठवण्यात येतात. कच्च्या मालाच्या किमती आणि कामगारांची मजुरी वाढल्याने गणेशमूर्तीच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्य़ांनी वाढल्या आहेत. तरीही भाविकांची भक्ती आणि कारागिरांची कुशलता यामुळे किमती वाढूनही मूर्तीच्या मागणीत घट झालेली नाही. डोळ्यांची सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशातून मागणी वाढत आहे.
हमरापूर-जोहे गणेशमूर्तीचे हब
पूर्वी पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागांत मोठय़ा प्रमाणात पसरला आहे. जोहे, हमरापूर, वडखळ, दादर, बोरी, शिर्की, उंबर्डे या परिसरांतही गणेशमूर्ती बनवणारे सुमारे सातशेहून अधिक लहान-मोठे कारखाने सुरू झाले आहेत. जोहे, हमरापूर ही गावे तर गणेशमूर्तीची बाजारपेठ म्हणून झपाटय़ाने विकसित झाली आहेत. या कारखान्यांमधून दरवर्षी जवळपास २० ते २२ लाख गणेशमूर्ती बनवल्या जाऊ लागल्या आहेत.
यंदा किमतीत २५ टक्के वाढ
पेण शहर व तालुक्यातील कारखान्यांत गणेशमूर्ती बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते. यातून ३० ते ३५ हजार लोकांना रोजगार मिळतो. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे ७० ते ८० कोटींची वार्षिक उलाढाल होते. गणेशभक्तांचा कल आणि मागणी लक्षात घेऊन दरवर्षी नवीन प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. चित्रपट, मालिका यांचा विशेष प्रभाव मूर्ती निर्मितीत दिसतो. मागील वर्षी बाहुबली, जय मल्हार अशा विविध स्वरूपांतील गणेशमूर्ती चांगल्याच गाजल्या होत्या. या वर्षीही पेणमध्ये २०० हून अधिक विविध प्रकारच्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या. काथ्या, शाडूची माती, रंग आणि कामगारांची मजुरी, जीएसटी या सर्वामुळे मूर्तीच्या किमतीत साधारणपणे २५ टक्के वाढ झाली आहे.
गणपती बाप्पा मोरया