महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी केली.
मुंबई- महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी केली.
डॉ. दाभोलकरांसारख्या विचारवंतांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पोलिसांच्या ताब्यात आहेत. मागील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे ५०० तरुणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले असून, ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना शोधून काढायचे असेल तर पोलिसांनी जयंत आठवले यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. कट्टरवादी संघटनांना वेसण घालण्यासंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर अटकेची ही कारवाई तातडीने केली जाईल, असे ते म्हणाले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, प्रोफेसर एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडात सातत्याने सनातनचे नाव घेतले जाते. पण या संघटनेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले गप्प का आहेत? त्यांच्याऐवजी त्यांचे दुस-या आणि तिस-या फळीतील कार्यकर्ते समोर येऊन खुलासे का करीत आहेत? असा प्रश्नही विखे-पाटील यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र एटीएसने मागील दोन आठवडय़ांमध्ये केलेल्या कारवाईचे खरे श्रेय कर्नाटक एटीएसला आहे. गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास करताना अनेक गोष्टींचा छडा लावला आणि त्यातूनच महाराष्ट्रातील हे कट्टरवादी ‘नेटवर्क’ समोर आले. अन्यथा वैभव राऊतचे बॉम्ब फुटेपर्यंत राज्य सरकारला महाराष्ट्रात काय सुरू आहे, याचा पत्ता लागला नसता, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
या संघटनांचे काम ‘अल कायदा’सारख्या दहशतवादी संघटनांच्या तोडीस तोड अशा गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. प्रत्यक्ष हल्ला करणारे निराळे, त्यांना शस्त्रे देणारे निराळे, हत्येची योजना आखणारे निराळे, आणि कोणाची हत्या करायची, हे ठरविणारेही निराळेच आहेत. प्रत्येकाला त्याची जबाबदारी ठरवून दिलेली असते व त्या पलिकडे त्याला इतर काहीच माहिती नसते. त्यामुळेच डॉ. दाभोलकर व कॉम्रेड पानसरेंच्या हत्या प्रकरणात अनेकांना अटक झाल्यानंतरही आजवर संपूर्ण कट उघडकीस येऊ शकलेला नाही.
Ya sanmanniy Hiroshi pakshnnetyala kayada kalato Kay? Aapale adnnyan prakat Karin Kay sadhale.? Shame shame..7