‘शब्दांना सत्याची धार’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणा-या खणखणीत बातम्यांमुळे वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणा-या ‘प्रहार’ला बुधवारी पाच वर्षे पूर्ण होत आहेत.
मुंबई – ‘शब्दांना सत्याची धार’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणा-या खणखणीत बातम्यांमुळे वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणा-या ‘प्रहार’ला बुधवारी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात ‘प्रहार’चा पाचवा वर्धापन दिन जल्लोषात साजरा होणार आहे.
पहिल्या वर्धापन दिनाला ‘प्रहार’च्या संकेतस्थळाचा शुभारंभ करून वाचकांना ‘ई-पेपर’ उपलब्ध करून दिला होता. आता पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘प्रहार’च्या इंग्रजी संकेतस्थळासह ‘एम डॉट प्रहार डॉट इन’ ही मोबाइलवरील वेबसाईट आणि वाडीवस्ती लेखमालेचे ‘ई-पुस्तक’ वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे.
वर्धापन दिन सोहळ्यासाठी दैनिक ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर, अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. पाचवा वर्धापन दिन सोहळा बुधवारी षण्मुखानंद सभागृहात दुपारी ३ वाजता होईल. या सोहळ्याला उद्योगमंत्री तसेच ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार नारायण राणे, संपादक महेश म्हात्रे, राणे प्रकाशनचे संचालक खासदार डॉ. निलेश राणे, राणे प्रकाशनचे संचालक आणि ‘स्वाभिमान संघटने’चे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वेळी ‘इंडियन आयडॉल’ व ‘सारेगामापा’फेम विपुल मेहता, देबंजना करमाकर, पूर्वी, देवेन्दर सिंग, विश्वजीत बोरवणकर या गायकांच्या ‘संगीत संध्या’ कार्यक्रमाने वर्धापन दिन जल्लोषात साजरा केला जाणार आहे.
‘प्रहार ऑनलाइन’ आता तुमच्या मोबाइलवर
बदलत्या तंत्रज्ञानानुसार वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ‘प्रहार’ने नेहमीच केला आहे. इंटरनेट आवृत्तीच्या माध्यमातून जगभरातील १०० हून अधिक देशांमधील मराठी लोकांशी जोडल्या गेलेल्या ‘प्रहार’ची इंटरनेट आवृत्ती आता थेट वाचकांच्या स्मार्टफोनवर उपलब्ध होणार आहे. ‘प्रहार’च्या पाचव्या वर्धापनदिनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते ‘प्रहार’च्या मोबाइल आवृत्तीचे अनावरण होणार आहे. m.prahaar.in यावरून स्मार्टफोन युजर्स मुंबई, कोकण, महाराष्ट्र, आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घेऊ शकतील.
वाडी-वस्ती झाले ‘ग्लोबल’
‘प्रहार’च्या रविवारच्या ‘कोलाज’ पुरवणीतील ‘वाडी-वस्ती’ या लेखमालेतून सुमारे सव्वादोन वष्रे विविध मान्यवरांनी आपल्या गावाशी, वाडी-वस्तीशी असलेला ऋणानुबंध उघड केला होता. ही लेखमाला आता सीमोल्लंघन करून ई-बुकच्या माध्यमातून जगभरात पोहोचत आहे. यात नामदेव ढसाळ, रमेश देव, अजित वाडेकर, मृणाल गोरे, प्रभाकर पणशीकर, शं. ना. नवरे, मधुकर नेराळे आदी प्रतिभावंतांनी आपल्या गावाच्या आठवणी जिवंत केल्या होत्या. गावप्रेमाने भारलेल्या तब्बल १०१ भागांची ही लेखमाला आता ई-बुकद्वारे सर्व प्रकारच्या ‘हँडहोल्ड डिव्हाइस’वर उपलब्ध होत आहे. युझर्स आपल्या अँड्रॉइड, आयपॅड, आयफोन स्मार्टफोनच्या माध्यमातून हा मौल्यवान ठेवा वाचू शकतील.
‘प्रहार’चे ‘इंग्रजी ऑनलाइन न्यूज पोर्टल’
‘प्रहार’ने २४ तास अपडेट राहणा-या मराठी ऑनलाइन आवृत्तीबरोबरच ई-पेपरच्या माध्यमातून नेट युजर्सशी स्वत:ला जोडले आहे. आता यात आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘प्रहार’च्या इंग्रजीत बातम्या देणा-या वेबसाइटचे अनावरण होत आहे. www.prahaar.in या आवृत्तीमध्ये मुंबई, महाराष्ट्र आणि कोकणातील बातम्या इंग्रजी भाषेतून जगभरात पोहोचणार आहेत. मराठी भाषेतील एका दैनिकाची इंग्रजी भाषेतील वेबसाइट सुरू करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
congrats web team….
congrats to all team