महापालिकेच्या प्रत्येक शालेय इमारतींना एमटीएनएलचा ६९९ रुपयांचा नेट पॅक टाकून दिला जाणार आहे.
मुंबई- महापालिकेच्या शाळांमध्ये पाच वर्षापूर्वी कर्मचा-यांकडून मोबाईल फोन आणि इंटरनेटचा गैरवापर होत असल्यामुळे ही सुविधा बंद करणा-या प्रशासनाने पुन्हा एकदा महापालिका शाळा इंटरनेटने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक शालेय इमारतींना एमटीएनएलचा ६९९ रुपयांचा नेट पॅक टाकून दिला जाणार आहे.
महापालिकेने ई-ऑफिस संकल्पना राबवण्यास सुरुवात केल्यामुळे शाळांही नेट कनेक्ट केले जात आहे. मात्र, यापूर्वी कर्मचा-यांकडून गैरवापर होत असला तरी आता जवळजवळ प्रत्येक कर्मचा-याकडे इंटरनेट सुविधा असलेला अँड्रॉईड मोबाईल फोन असल्याने कर्मचा-यांकडून इंटरनेटचा गैरवापर होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध माध्यमांच्या सुमारे अकराशे शाळांच्या एकूण ४०७ शालेय इमारती असून येथील संगणकांना इंटरनेट जोडणी करण्यात येत आहे. महापालिकेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी ई-ऑफिस कार्यप्रणालीची अंमलबजावणी केली जात आहे.
त्यामुळे शिक्षण विभागाची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणे आवश्यक असल्यामुळे प्रशासकीय अधिकारी (शाळा) विभाग कार्यालय यांना शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क, सांख्यिकी माहिती, उपस्थिती भत्ता, अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे लाभ, बाल वैद्यानिक परीक्षांचे अर्ज, तसेच इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज संगणकावर भरणे आवश्यक असते.
त्यामुळे महापालिकेच्या ४०७ शालेय इमारतींमध्ये इंटरनेट ब्रॉडब्रँड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरता मुंबई महानगर टेलिफोन निगम यांच्याकडून ६९९ रुपयांचा प्रत्येक महिन्याला प्रती ब्रॉडबँड्र प्लान घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांनी सांगितले.
हि सुविधा नका देऊ.प्लीज