सौरऊर्जा निर्मितीचा खर्च जास्त असल्याने तिच्यापासून निर्माण होणारी वीज अत्यंत महागडी असते. त्यामुळे सौरऊर्जेचा वापर म्हणावा त्या प्रमाणात केला जात नाही. पण …
ऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणा-या इंधनांचे संपत चाललेले साठे आणि या इंधनाच्या सातत्याने वाढणा-या दरांमुळे नव्या ऊर्जा पर्यायांचा शोध घेतला जात आहे. त्यातही सौरऊर्जा हा एक अतिशय चांगला आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा पर्याय आहे. त्यामुळे सौरऊर्जेच्या साहाय्याने वीज निर्मिती करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात असतात.
मात्र, सौरऊर्जा निर्मितीचा खर्च जास्त असल्याने तिच्यापासून निर्माण होणारी वीज अत्यंत महागडी असते. त्यामुळे सौरऊर्जेचा वापर म्हणावा त्या प्रमाणात केला जात नाही. पण जर निर्मिती खर्च कमी केला तर हा एक अतिशय चांगला ऊर्जा पर्याय आहे हे लक्षात घेऊन या ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी करण्याचे तंत्रज्ञान नुकतेच विकसित केल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे संशोधन करणारे शास्त्रज्ञ भारतीय आहेत.
या शास्त्रज्ञांनी कार्बनचे संयुग असलेल्या ग्राफिनवर आधारित नवीन सोलार सेल तयार केले आहेत. ग्राफिनच्या वापरामुळे सौरऊर्जा निर्मितीचा खर्च ब-याच प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. गुजरात एनर्जी अँड रिसर्च मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे (गेर्मी) संचालक टी. हरिनारायण यांनी ही माहिती दिली आहे. जगभरातील सौरऊर्जेवर संशोधन करणा-या शास्त्रज्ञांचे लक्ष ग्राफिनकडे लागले आहे. ग्राफिनमध्ये कार्बनच्या अणूचा एक थर षटकोनी रचनेत आढळतो. या घटकामध्ये अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत. ग्राफिन तांब्यापेक्षा अधिक चांगला विद्युतवाहक असून तो ९० टक्के पारदर्शक आहे. त्यामुळे तो पारदर्शक वस्तू तयार करण्यासाठी आणि इलेक्ट्रोडमधून ऊर्जेचे वहन होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
संजय बेहुरा, सस्मिता नायक आणि ओमकार जानी आणि इंद्रजीत मुखोपाध्याय या संशोधकांनी हे संशोधन केले. येत्या फेब्रुवारीत ‘कार्बन’ जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध होणार आहे.
सोलार सेलमध्ये ग्राफिनचा वापर करण्याबाबत त्यांनी संशोधन केले. यामुळे उत्पादनखर्चात १० ते १५ टक्क्याने बचत होणार आहे.
सध्या सोलार सेलमध्ये सिलिकॉन वापरले जाते. सिलिकॉन चांगले ऊर्जावाहक असले तरी ते अत्यंत महाग आहे. त्यामुळे सौरऊर्जा निर्मितीचा खर्च जास्त असतो. सध्या अनेक सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये सिलिकॉन वापरले जाते. या प्रकल्पांमध्ये ग्राफिन वापरल्यास त्यांचा खर्च कमी होऊ शकेल, असे संशोधकांनी सांगितले.
मी इच्छुक आहे