ठाण्यासह भिवंडी, नालासोपारा येथे चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या चार घटना समोर आल्या असून उल्हासनगरात एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
ठाणे- ठाण्यासह भिवंडी, नालासोपारा येथे चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या चार घटना समोर आल्या असून उल्हासनगरात एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या नराधमांना अटक केली असली, तरी समाजात फोफावत चाललेल्या या प्रवृत्तींमुळे चिमुकल्याही सुरक्षित नाहीत, हे अधोरेखित झाले आहेत.
भिवंडीच्या बंगालपुरा भागात रहेमान इमारतीच्या गच्चीवर खेळत असलेल्या एका अवघ्या चार वर्षाच्या मुलीवर त्याच इमारतीत राहणा-या राजा मोहम्मद शेख (१६) याने अत्याचार केला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित मुलीची आई शनिवारी सायंकाळी तिचा १० महिन्यांचा मुलगा आणि मुलीसह गच्चीत बसली होती.
यावेळी मुलगा झोपल्याने त्याला घरी ठेवण्यासाठी ती मुलीला गच्चीतच सोडून खाली गेली. काही वेळाने मुलीला घेण्यासाठी ती पुन्हा वर आली असता तळमजल्यावर राहणारा राजा तिच्या मुलीवर अत्याचार करत असल्याचे तिला दिसले. मुलीच्या आईला पाहून राजा तिथून पळून गेला.
मुलीच्या हातात १० रुपयांची नोट देऊन चॉकलेटचे आमिष दाखवत राजाने अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. याप्रकरणी मध्यरात्री राजा शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व राजाला अटक करण्यात आली. त्याला रविवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने २३ सप्टेंबपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकारात जखमी झालेल्या मुलीवर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दुस-या घटनेत ठाण्याच्या ढोकळी नाका भागात राहणा-या १४ वर्षीय मुलीवर शेजारी राहणा-या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत एक महिन्यापासून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विलास उर्फ बाबू पवार (२२) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. बाबू याने या मुलीला या प्रकारची कुठे वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. शनिवारी अखेर या मुलीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पीडित मुलीला ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिस-या घटनेत नालासोपारा पूर्व येथे राहाणा-या ८ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून ३२ वर्षीय सुरेंद्रकुमार तिवारी याने घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही तिवारीने या मुलीला दिली. एक वर्षापासून सुरेंद्रकुमार तिवारी अत्याचार करत असल्याची माहिती अखेर या मुलीने तिच्या वडिलांना दिली. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चौथ्या घटनेत याच भागत राहणा-या एका ५ वर्षीय मुलीवर एका १५ वर्षाच्या मुलाने ९ सप्टेंबर रोजी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी घराजवळील एका टेम्पोजवळ खेळत असताना आरोपी मुलाने तिला टेम्पोत नेऊन अत्याचार केला व पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर पाचव्या घटनेत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणा-या ८ वर्षीय मुलावर दोन अल्पवयीन मुलांनी घरी बोलावून अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.
पीडित मुलगा उल्हासनगर कॅम्प ४ परिसरात राहणारा असून त्याला त्याच्या ओळखीच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने घरी बोलावून माळयावर नेले आणि एका साथीदाराच्या मदतीने त्याच्यावर अत्याचार केला. तब्बल १ महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. अखेर त्या मुलाने त्याच्या आईला याबाबत सांगितल्यानंतर तिने विठ्ठलवाडी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
बायांनो नोकरी करू नका मुलांना जपल पाहिजे