घरातील ज्येष्ठ मंडळी म्हातारी झाली की त्यांच्याकडे लक्ष द्यायला किंवा त्यांची विचारपूस करायला कोणालाच वेळ नसतो. मग त्यांची रवानगी ‘वृद्धाश्रमात होते. १ ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने घरातील ज्येष्ठ मंडळींची कशी काळजी घ्यावी याविषयी काही टिप्स.
घरातली ज्येष्ठ मंडळी म्हणजे आपले आजी-आजोबा, किंवा आई-वडील वृद्ध झाले की त्यांचं वागणं अगदी लहान मुलाप्रमाणे होतं. नोकरी आणि कामधंद्यामुळे घरातल्या मंडळींना त्यांच्याकडे पुरेसं लक्ष द्यायला वेळ नसतो. आपल्याशी बोलायला कोणालाच वेळ नाही, आपण आपल्या घरातल्यांना नको आहोत अशी काहीशी त्यांची मानसिकता झालेली असते. त्यामुळे त्यांना सतत कसलीतरी भीती वाटते. त्या भीतीपोटी किंवा कधी कधी त्रस्त करणा-या व्याधींमुळे ही मंडळी एकटी पडतात. पण त्यांना या एकटेपणातून मुक्त करण्यासाठी त्यांचा थोडासा विचार करून त्यांची सोय कशी होईल अशा काही गोष्टी घरात केल्या तर त्यांनाही बरं वाटेल. दैनंदिन जीवनात अगदी सहज अमलात आणता येतील अशा काही गोष्टीचा विचार करूया. मग बघा त्यांनाही नक्कीच बरं वाटेल.
>म्हाता-या माणसांनी गॅसजवळ जाणं शक्यतो टाळावं. कारण कधी कधी गॅस सुरू राहणे, किंवा जेवण गरम करायला ठेवणे आणि नंतर विसरून जाणे, अशा गोष्टी होत असतात. म्हणूनच त्यांचं जेवण त्यांना घ्यायला अतिशय सोपं होईल अशा ठिकाणी ओटयावर किंवा डायनिंग टेबलावर ठेवावं. तसंच हे जेवण दीर्घकाळ पदार्थ गरम ठेवणा-या भांडयात काढून ठेवावं. म्हणजे त्यांना गरम गरम जेवण तर मिळेलच पण त्याचबरोबर त्यांना ते घेणंदेखील सहज शक्य होईल. किंवा त्यांच्यासाठी एक छोटासा मायोक्रोव्हेव जवळ ठेवावा. कारण तो हाताळणं त्यांच्यासाठी अधिक सोयीस्कर होईल.
>दुपारच्या वेळी चहा किंवा कॉफी करण्यासाठी एक इलेक्ट्रिकल किटली द्यावी. म्हणजे त्यांना दुपारचा चहा स्वत:चा स्वत: करता येईल.
>त्यांच्या गरजेच्या वस्तू त्यांना सहज हातात मिळतील इतक्याच उंचीवर ठेवाव्यात म्हणजे त्यांना त्या काढणं सुलभ होईल. उदहारणार्थ, ताट, वाटया, पाणी पिण्याची भांडी, चमचे, डिश अशा गोष्टी ओटयावर किंवा टेबलावर काढून ठेवाव्यात. कारण या वयात सांधेदुखी किंवा हात-पाय अखडणे यासारख्या व्याधी डोकं वर काढतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट कमरेत वाकून काढणे किंवा उंचावर चढून काढणे त्यांना जमत नाही.
>या वयात प्रत्येक वस्तू हाताळताना त्यांच्या मनात सतत भीती असते. विशेषत: काचेच्या वस्तू हाताळताना ते खूप घाबरतात. म्हणूनच त्यांच्यासाठी ठेवण्यात येणा-या सामानात काचेच्या वस्तूंचा वापर टाळावा. आजकाल बाजारात अनब्रेकेबल वस्तू भरपूर आल्या आहेत. अशा अनब्रेकेबल वस्तूंचा समावेश त्यात करावा जेणेकरून त्या पडल्या तरी तुटणार नाहीत आणि त्यांची धास्ती काहीशी कमी होईल.
>वयोमानानुसार त्यांच्या हातातून वस्तू पडणारच. कारण कधी कधी काही मंडळींचे हात थरतात. हे असं होणारच अशी सर्वप्रथम तुमची मानसिकता ठरवून घ्या. काही सांडलंच तर त्यांच्यावर रागवू नका. न बोलता ते पटकन उचलून घ्या. त्यांना किचनमध्ये मोकळेपणाचे वावरू द्या.
>त्यांचं आवडतं पेय घेण्याची मूभा त्यांना मोकळेपणाने घ्या. कधी कधी काही जणांना रात्री झोपताना एखादं आवडतं पेय पिण्याची सवय असते. म्हणजे त्यांना झोप लागते. अशी पेय अगदी सहज उपलब्ध होतील ते पाहा. थोडक्यात त्यांना मोकळीक द्या.
>त्यांना अगदी सहज पचेल असाच आहार त्यांच्यासाठी तयार करा. म्हणजे त्यांना सहज चावता येईल अशा उकडलेल्या भाज्या, मऊ भात त्यांना द्या. तसंच त्यांच्यासाठी तयार केलेलं जेवण हे मसालेदार किंवा झणझणीत नसेल याची काळजी घ्या. शक्यतो त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घाला. म्हणजे त्यांना तेच तेच खाऊन कंटाळा येणार नाही.
बाथरूममधली व्यवस्था
>ज्येष्ठांची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते ती बाथरूममध्ये. तिथे पाय घसरून पडण्याची शक्यता अधिक असते. म्हणून त्यांना बसायला आणि उठायला अगदी सहज जमण्यासाठी बाथरूममध्ये ठिकठिकाणी पकडण्यासाठी हँडल लावावेत. उदाहरणार्थ शॉवर आणि कमोडजवळ.
>बाथरूममध्ये आजकाल जमिनीवर टाइल्स लावल्या जातात. त्यावरून पाय घसरण्याची शक्यता अधिक असते. मात्र बाजारात जरा खडबडीत टाइल्स असतात ज्याच्यावरुन पाय मुळीच घसरत नाही. तशा खडबडीत टाइल्स लावाव्यात. म्हणजे त्यांचा त्यावरून पाय घसरणार नाही.
>बाथरूममध्ये लाइट्सची योग्य रचना असावी. जेणेकरून रात्रीच्या वेळी त्यांना बाथरूमला जायला समस्या येणार नाही.
>तुमच्या घरातली मंडळी खूप कमजोर किंवा अशक्त असतील तर त्यांना अंघोळीसाठी बसायला स्टुल ठेवावं. म्हणजे जमिनीवरून उठण्याचा त्यांचा त्रास वाचेल.
झोपण्याची खोली
>ज्या खोलीत तुम्ही घरातल्या ज्येष्ठ मंडळींची व्यवस्था करणार असाल त्यांच्या खोलीत एक लहानसा दिवा (नाइट लॅम्प)जरूर लावावा.
>त्यांच्या बिछान्याजवळ एक बेल लावावी. जेणेकरून आपत्काळात किंवा रात्रीअपरात्री तुम्हाला बोलवण्यासाठी त्यांना या बेलचा वापर करता येईल.
>रेडिओ ऐकण्यासाठी, टीव्ही बघण्यासाठी एखादं पुस्तक वाचण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. यामुळे मनाने ते कायम तरुण राहतील.
>सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्यांची गरज आहे आणि तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे, याची त्यांना सतत जाणीव करून द्या.
सुंदर लेख , ! धन्यवाद अबोली पेंडुरकर .