अमेरिकेला सँडी वादळाचा तडाखा बसल्यानंतर आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले नीलम चक्रीवादळ वायव्येकडे सरकरण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई – अमेरिकेला सँडी वादळाचा तडाखा बसल्यानंतर आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले नीलम चक्रीवादळ वायव्येकडे सरकरण्यास सुरुवात केली आहे. सध्या या चक्रीवादळामुळे मुंबईला, पश्चिम किनारपट्टीला धोका नाही. मात्र या चक्रीवादळाने दक्षिण चेन्नईची किनारपट्टी ओलांडल्याने महाराष्ट्र-आंध्र सीमेवर पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
अमेरिकेत निर्माण झालेल्या सँडी वादळाशी ‘नीलम’चा काही संबंध नाही. अमेरिकेतील वादळाचा भारतावर परिणाम व्हायचा असेल तर प्रशांत महासागरातील वातावरणाची स्थिती बदलून वादळ निर्माण झाले असते, असे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राचे उपमहासंचालक डॉ. एन. वाय. आपटे यांनी सांगितले. नीलम चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ आहे. शिवाय ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात वादळे येतच असतात. ही नियमित स्थिती आहे.
हे वादळ दोन दिवसांत विरण्याची शक्यता असल्याने त्याचा फारसा धोका संभवत नाही. मात्र, या वादळाने किनारपट्टी ओलांडल्याने महाराष्ट्र- आंध्रच्या सीमेवर पाऊस होण्याची शक्यता आहे, असे डॉ. आपटे म्हणाले.
‘नीलम’पेक्षाही ‘सँडी’ तीव्र
अमेरिकेत निर्माण झालेल्या सँडी वादळाचा वेग ताशी १३० किलोमीटर आहे. त्या तुलनेत नीलमचा वेग ६० ते ७० किलोमीटर इतका आहे. पुढील टप्प्यात नीलमच्या वा-यांची गती तासाला ८० किलोमीटर असेल. त्यामुळे किनारपट्टी भागात धोक्याची सूचना देण्यात आली असून, आपत्ती व्यवस्थापनालाही कळवण्यात आले असल्याचे डॉ. आपटे यांनी सांगितले.
njv