आधीच्या रेल्वे बजेटमध्ये जाहीर होऊनही सुरू न झालेल्या रेल्वे गाड्या सुरू करण्याचा धडाका लावणारे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू २०१३च्या बजेटमध्ये जाहीर झालेल्या ‘रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर’ला हिरवा बावटा दाखवायचे मात्र विसरूनच गेले आहेत.
रत्नागिरी- आधीच्या रेल्वे बजेटमध्ये जाहीर होऊनही सुरू न झालेल्या रेल्वे गाड्या यंदाचे बजेट २६ फेब्रुवारीला सादर करण्याआधी सुरू करण्याचा धडाका केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच दाखवला. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीतून रिमोटद्वारे आठ गाड्यांना एकाच दिवशी हिरवा बावटा दाखवला. नागपूर स्थानकातून निघालेली गाडी नितीन गडकरींना उद्घाटन करता यावे यासाठी पुन्हा मागे बोलावण्याची नियमबाह्य किमयाही बुधवारीच त्यांच्या अधिका-यांनी दाखवली. या सगळ्या धावपळीत गेल्याच्या गेल्या म्हणजे २०१३च्या बजेटमध्ये जाहीर झालेल्या ‘रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर’ला हिरवा बावटा दाखवायचे मात्र रेल्वेमंत्री विसरूनच गेले आहेत.
२०१३मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी रत्नागिरी-मडगाव ही दररोज सुटणारी पॅसेंजर ट्रेन जाहीर केली. जाहीर झाल्यानंतर पावणेदोन वर्षाने म्हणजे २०१४ च्या नोव्हेंबरमध्ये ही गाडी चालवण्याची तयारी झाल्यावर गाडीचे वेळापत्रक तयार होऊन ते रत्नागिरीपासून मडगावपर्यंतच्या सर्व २० स्थानकांना देण्यातही आले. रत्नागिरी ते मडगावपर्यंत १८ थांबे घेणा-या या गाडीला ५०१०१/५०१०२ असे क्रमांकही बहाल करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्यानंतर जाहीर झालेल्या म्हणजे २०१४च्या बजेटमधील गाड्या धावायला लागल्या तरी दोन वर्षापूर्वी जाहीर झालेली रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर अजूनही कागदावरच उभी आहे.
विशेष म्हणजे कोकणातील (तत्कालीन) राजापूर मतदारसंघातून दीर्घकाळ लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे सुरेश प्रभूच आता मोदी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री आहेत. यंदाचे बजेट त्यांचे पहिलेवहिले बजेट आहे. त्याआधी गाड्या सुरू करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, ज्या कोकणशी नाळ जुळलेली आहे, त्या कोकणमधील गाडी सुरू करायला त्यांना वेळच मिळालेला नाही. जाहीर वेळापत्रकानुसार ही गाडी रत्नागिरीहून पहाटे ५ वाजता सुटून मडगावला सकाळी ११.४० वाजता पोहोचणार आहे. तिथून दुपारी २ वाजता ती परतीच्या प्रवासाला निघून ती रात्री ८ वाजून १० मिनिटांनी ती रत्नागिरी स्थानकावर येईल. ही गाडी दोन वर्षे सुरू झाली नसली तरी तिच्या मार्गावरील १८ थांब्यांवरील प्रवाशांना हे वेळापत्रक तोंडपाठ झाले आहे. प्रभू या गाडीला कधी हिरवा बावटा दाखवतात यासाठी सगळे ताटकळले आहेत.
” हे प्रभू ! मेरा काम करो रे ! कोंकण रेल्वे पर जरा खास ध्यान देओ रे !! जय प्रभू ! जय प्रभू ! जय जय प्रभू !!