सोरायसिस हा संसर्गजन्य आजार नाही. पण या आजारात त्वचेवर निर्माण होणारे चट्टे रुग्णांच्या भावनांवर, वागणुकीवर परिणाम करतात. अशा वेळी सकारात्मक वृत्तीनं या आजारावर उपचार घेतल्यास नक्की बरं होता येतं. फक्त संयम आणि काळजी महत्त्वाची असते.
राजेश दहा वर्षाचा होता. तेव्हा त्याच्या मानेवर एक छोटीशी पुळी आली. नंतर ती पुळी पिकली. पुळी गेल्यानंतर तिथं तपकिरी करडया रंगाचा डाग तयार झाला. त्यानंतर राजेशला काही दिवसांनी मानेवर ज्या ठिकाणी पुळी आली होती, तिथून थोडया अंतरावर आणखी एक पुळी आली. ती पुळी गेल्यावर तिथेही तपकिरी करडया रंगाचा डाग तयार झाला. हळूहळू राजेशच्या मानेवरच्या या डागांचा पृष्ठभाग खडबडीत होत गेला. त्या डांगांवरचे पापुद्रे सुटू लागले. ते चट्टे लालसर-पांढ-या रंगाचे दिसू लागले. चट्टयांचं प्रमाणही वाढू लगालं. तो त्वचारोगतज्ज्ञांकडे गेला. तिथे त्याला ‘सोरायसिस’ असल्याचं निदान झालं.
सोरायसिस या रोगाचे बरेच प्रकार आहेत. त्यात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा प्रकार म्हणजे लाल रंगाचे चट्टे उठणं. सोरायसिस झालेल्यांपैकी ८० टक्के लोकांमध्ये हाच प्रकार दिसून येतो. यामध्ये लालसर रंगाच्या चकत्या येतात. या चकत्या गोलाकार किंवा लंबवर्तुळाकार असतात. चकतीचा पृष्ठभाग खडबडीत असतो. कधी-कधी तो पांढ-या खवल्यांचा असतो. हे सफेद चंदेरी रंगाचे खवले सैलसर चिकटलेले असतात. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाजवल्यानंतर भुशाप्रमाणं खाली पडतात. त्वचेच्या बाह्यपेशींचं फारच जलदगतीनं विभाजन झाल्यामुळे त्वचा जाड होते. पातळ पापुद्रयासारखे खवले निघतात. चट्टे हे साधारणत: सर्वप्रथम कोपर, गुडघे, डोक्याची त्वचा आणि पाठीच्या खालच्या भागात जास्त प्रमाणात दिसतात. काही रुग्णांमध्ये नंतर ते हळूहळू अंगभर पसरतात. घडीचा, ठिपक्यांचा, नखांचा, पुळीचा, डोक्याचा, सर्वागभर, सांध्यांचा, हातापायांचा हे सोरायसिसचे काही प्रकार आहेत.
कारणं
या आजाराचं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. दारू पिण्याचं वा सिगारेट ओढण्याचं व्यसन असणा-यांनाही सोरायसिस होतो. हिवाळयात या आजाराचं प्रमाण वाढतं. तर उन्हाळयात कमी होतं. परंतु कधी-कधी जास्त सूर्यप्रकाशही हानिकारक ठरू शकतो. तर कधी औषधांमुळेही सोरायसिसचा आजार बळावतो. जसं की, मलेरियाची औषधं (क्लोरोक्विन), वेदनाशामक औषधं (रअकऊर), उच्चरक्तदाब कमी करण्याची औषधं, ‘लिथिअम’सारखी मानसिक आजारांवरील औषधं.
‘इंडियन सोरायसिस फाउंडेशन’ने सोरायसिस या आजाराच्या उगमाची कारणं शोधली. त्यात त्यांना असं दिसून आलं आहे की, हा आजार म्हणजे शरीरांतर्गत पेशींची एकमेकांमधली लढाई आहे. या आजाराचं दुसरं कारण आहे आनुवंशिकता. सोरायसिसच्या ३० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिकता हे कारण आढळून आलं आहे. जर आई-वडील दोघंही सोरायसिसनं आजारी असतील, तर मुलाला सोरायसिस होण्याची शक्यता ३० टक्क्यांनी वाढते.
घडीतला सोरायसिस – यात शरीरात घडी पडणा-या भागांवर चट्टे येतात. स्त्रियांच्या स्तनांच्या खाली किंवा जांघेत चट्टे येतात. चट्टे अडचणीच्या जागेत येतात. अशा जागांमध्ये सतत घाम येतो व तो पुसला न गेल्यामुळे ते भाग ओलसर राहतात. या चट्टयांवर खवलं कमी दिसतात.
नखांचा सोरायसिस – हाता-पायांच्या बोटांच्या नखांच्या आकारात बदल होतो. नखं जाड होतात. नखांवर एक ते दोन मिमी आकाराचे छोटे खड्डे दिसतात. ठिसूळ बनतात. नखांचा कडक भाग त्याच्या गादीपासून वेगळा होतो. हळूहळू ती पिवळी दिसायला लागतात. नखांखाली तेलाचा चट्टा आल्यासारखा दिसतो.
पुळीचा सोरायसिस – सोरायसिसच्या या प्रकारात शरीराच्या ज्या भागावर तो होतो, त्या ठिकाणी खवलं येत नाहीत. तर प्रथम त्वचा लालसर होते. त्यावर पूनं पिकलेल्या छोटया-छोटया पुळया येतात. नंतर त्या पुळया करडया रंगाच्या होऊन नंतर त्या सुकतात.
ठिपक्यांचा सोरायसिस – यात छातीवर, पाठीवर छोटे-छोटे ठिपके पसरलेले दिसतात. सोरायसिसचा हा प्रकार ब-याचदा लहान मुलं आणि तरुणांमध्ये आढळून येतो. या प्रकारच्या सोरायसिसची सुरुवात ही ब-याचदा टॉन्सिलायटिस, घशाचा दाह अशा संसर्गजन्य आजारांनंतर होते.
सर्वागपूर्ण सोरायसिस – नावाप्रमाणंच या प्रकारातला सोरायसिस सर्वागावर येतो. मात्र हा साधारण सोरायसिसपेक्षा वेगळा दिसतो. संपूर्ण त्वचा लालसर दिसते. त्यावरून पातळ पापुद्रे सुटायला लागतात. मात्र भरपूर खाज येते.
डोक्याचा सोरायसिस – यामध्ये फक्त डोक्यावरच लालसर चट्टे येतात. त्यावर पांढ-या रंगाची खवले असतात.
हातापायांचा सोरायसिस – सोरायसिसचा हा प्रकार अतिशय वेदनादायी असतो. यामध्ये प्रथम हाताच्या तळव्यांवर काही ठिकाणी त्वचा जाड, कडक होते. काही ठिकाणी त्वचेवर भेगाही पडतात. या भेगा अत्यंत वेदनादायी असतात. नंतर जाड झालेल्या त्वचेचे पापुद्रे सुटायला लागतात. खाजही येते.
सांध्यांचा सोरायसिस – सोरायसिसचा आजार असणा-या पाच टक्के रुग्णांना या प्रकारचा सोरायसिस होतो. यात बोटांचं शेवटचं पेर सुजतं. इतकं की ते दुखायला लागतं. इतरही लहान सांधे दुखतात. हा त्रासदायक प्रकार वाढल्यास हाडांचा वरचा पातळ थर नष्ट होतो. बोटं लहान व्हायला लागतात.
सर्वसाधारणपणे त्वचेच्या अन्य प्रकारच्या आजारांमध्ये निरोगी त्वचा यायला सर्वसाधारणपण२८ दिवसांचा कालावधी लागतो. परंतु सोरायसिसमध्ये हेच काम चार दिवसात होतं. त्यामुळे जिथे कमकुवत त्वचा तयार होते, तिथे पांढरे, चंदेरी पापुद्रे सुटतात. त्यांना ‘स्केल्स’ म्हणतात. सगळयात महत्त्वाचं म्हणजे या आजारात पांढरी खवलं पडत नाहीत. तसंच यामुळे कोणताही जंतुसंसर्ग होत नाही.
साधारणपणे असा समज आहे की, हा त्वचारोग चुकीच्या खाण्यापिण्यामुळे होतो. परंतु सोरायसिस हा प्रकार जास्त वा कमी खाण्यामुळे किंवा जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होत नाही. तरीही पथ्य पाळाले तर चांगलंच आहे. म्हणजे औषधाची मात्रा लवकर लागू पडते. म्हणजे –
>> आहारात मिठाचा वापर बेतानंच करावा.
>> कारल्याच्या रसात एक चमचा लिंबाचा रस मिसळून प्यावा.
>> जेवणात गाजराचा कीस, कोबी, काकडीपासून बनवलेले पदार्थ असावेत. हे पदार्थ स्वच्छ धुवून कच्चे खाल्ल्यास काहीच हरकत नाही.
>> शाहाळयाचं पाणी प्यावं.
>> बीट, भोपळयापासून बनवलेले पदार्थ खावेत.
>> मोड आलेल्या कडधान्यांपासून बनवलेल्या पदार्थाचा आहारात समावेश असावा.
>> चहा, कॉफी, तंबाखू, दारूचं व्यसन सोडावं.
सोरायसिसची उपचार पद्धती, हा सर्वात महत्त्वाचा पण दुर्लक्षिला जाणारा भाग आहे. रुग्णाच्या सहकार्याशिवाय ती व्यवस्थितपणे पूर्ण होत नाही आणि पर्यायानं आजार पूर्णपणे बरा होत नाही. त्यासाठी पुढील पथ्य पाळणं गरजेचं आहे.
>> मानसिक ताणतणाव कमी करणं. त्यासाठी योगासनं, प्राणायाम हे प्रकार खूप फायदेशीर ठरू शकतात.
>> दारू, सिगारेट आणि तंबाखूच्या व्यसनांपासून स्वत:ची सुटका करून घ्या.
>> ज्या-ज्या ठिकाणी त्वचेला इजा पोहोचते, तिथे सोरायसिसचा आजार असण्याची वा आधी होऊन गेलेला असल्यास तो पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे छोटया-मोठया जखमांपासून सावध राहा.
>> सुती, मऊ आणि सैलसर कपडे वापरा.
>> सर्वसाधारणपणे अल्कली गुणधर्म जास्त नसणा-या सौम्य साबणांचा वापर करावा. तसंच आंघोळीच्या आधी तेल किंवा तत्सम स्निग्ध पदार्थ आवर्जून लावावेत.
>> तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही बाहेरची औषधं स्वत:च्या मनानं घेऊ अथवा वापरू नका. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा वापर अचानकपणे स्वत:च्या मनानं बंदही करू नका.
थोडक्यात काय तर थोडं संयमानं, सकारात्मक वृत्तीनं घेतल्यास या आजारावर नक्की मात करता येईल. शेवटी आत्मविश्वास महत्त्वाचा!
सोरायसिस हा आजार वनौषधींच्या सहाय्यानं तसंच व्यवस्थित पथ्यं पाळल्यास बरा होऊ शकतो. हा आजार संसर्गजन्य नाही. तसंच तो फक्त पाच ते दहा टक्के या प्रमाणातच आनुवंशिक आहे. त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता सोरायसिसच्या रुग्णांनी औषधोपचाराकरता स्वत:हून पुढाकार घ्यावा. या आजाराचा औषधोपचार स्वत:च करू नये. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावा. – डॉ. प्रमोद अंबळकर (एमडी. अल्टरनेटिव्ह मेडिसीन) अध्यक्ष, इंडियन सोरायसिस फाउंडेशन
मला सध्या नखावर उभ्या रेषा पडल्या असून ३-४ नखे हि खोलगट गेली असून पातळ झाली आहेत कृपा करून यासाठी उपचार आणि औषध सांगावे