परळचे हाफकिन जीव औषध महामंडळ ‘मिक्स गॅस गँगरिन’ औषध तयार करणार आहे. मधुमेहींचे अवयव वाचवण्यासाठी हे औषध परिणामकारक ठरेल.
मुंबई – परळचे हाफकिन जीव औषध महामंडळ ‘मिक्स गॅस गँगरिन’ औषध तयार करणार आहे. मधुमेहींचे अवयव वाचवण्यासाठी हे औषध परिणामकारक ठरेल. यासाठी केंद्र सरकार महामंडाळाला तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी देणार आहे. जून महिन्याअखेरीस औषधांची निर्मिती सुरू होणार असून, येत्या वर्षभरात ती बाजारात उपलब्ध होणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय महासंचालक संभाजी झेंडे यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेने देश पोलिओ मुक्त म्हणून घोषित केले आहे. यात हाफकिन महामंडळाचा महत्त्वाचा वाटा आहे. महामंडळात तयार होत असलेल्या विविध औषधांची ख्याती सातासमुद्रापार आहे. मधुमेह रुग्णांना गँगरिनचा मोठा धोका असतो. गँगरिन शरीरात पसरत गेल्यास ते रुग्णाच्या जीवावर बेतणारे ठरू शकते. त्यामुळे रुग्णाचा एखादा अवयव कापावा लागतो. तसेच रस्ते, रेल्वे अपघात, बॉम्बस्फोट, गोळीबारातील जखमींना वेळेत औषधोपचार न मिळाल्यास त्यांना गँगरिन होण्याची शक्यता अधिक असते.
मात्र ‘मिक्स गॅस गँगरिन’ औषधामुळे रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. मिक्स गॅस गँगरिन अँटिटॉक्सिनकरता महामंडळातील शास्त्रज्ञांचे पथक गेल्या पाच वर्षापासून कार्यरत होते. जुलै २०१२मध्ये तसा संशोधन अहवाल केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्यांतर्गत असलेल्या बायोटेक्नोलॉजी विभागाला सादर करण्यात आला होता.
त्यानंतर बायोटेक्नोलॉजीच्या तज्ज्ञ समितीपुढे महामंडळाच्या शास्त्रज्ञांनी अहवालाचे सादरीकरण केले. तज्ज्ञ समितीने महामंडळाच्या पिंपरी येथील प्रतिविष व रक्तजल विभागात मिक्स गॅस गँगरिन अँटिटॉक्सिनचे परीक्षण केले. परीक्षण आणि अहवाल पडताळणीअंतर्गत समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतर ४ मार्च २०१४ रोजी बायोटेक्नोलॉजी विभागाने मिक्स गॅस गँगरिन अँटिटॉक्सिन प्रकल्पास मान्यता दिली.
या औषधाच्या पुढच्या टप्प्यातील संशोधन व निर्मितीकरता केंद्र सरकार महामंडळाला २ कोटी ४० लाख रुपये देणार आहे. त्यानुसार १ कोटी ४० लाख रुपयांचा पहिला हप्ता महामंडळाला तत्काळ दिला जाणार आहे. येत्या जूनपासून या प्रकल्पास सुरुवात होईल. पुढील वर्षात गॅस गँगरिन बाजारात उपलब्ध होणार आहे. त्याची किंमत सुमारे ३ ते ५ हजार रुपये असणार असून, याचा पुरवठा संपूर्ण देशात केला जाणार आहे. यापुढे सरकारी रुग्णालयांना परदेशातून गॅस गँगरिनची आयात करावी लागणार नाही.
लक्षणे
जखमांतून विशिष्ठ प्रकारचा वास येतो
जखमेच्या ठिकाणी वेदना होतात
त्वचा काळी-जांभळी होते
अधूनमधून ताप येतो
thanks to halfkin