पँथर कधीही मरणार नाही तो आजही जिवंत आहे, तो आजही सळसळत आहे तुझ्या आणि माझ्या रक्तात! असा विद्रोहाचा जय- भीम ठोकत महाकवी नामदेव ढसाळ यांना तमाम आंबेडकरी जनता, साहित्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी निरोप दिला.
मुंबई- पँथर कधीही मरणार नाही तो आजही जिवंत आहे, तो आजही सळसळत आहे तुझ्या आणि माझ्या रक्तात! असा विद्रोहाचा जय- भीम ठोकत महाकवी नामदेव ढसाळ यांना तमाम आंबेडकरी जनता, साहित्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी निरोप दिला.
वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलपासून चैत्यभूमीपर्यंत लोटलेल्या जनसागराने, ‘उद्याची सकाळ नामदेव ढसाळ, जागा हो जागा भिमाच्या वाघा, एकच पँथर बाकी नंतर अशी श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करत ढसाळांच्या आठवणींना उजाळा दिला.
आंबेडकरी चळवळीतील मैलाचा दगड ठरलेल्या ‘दलित पँथर’च्या स्थापनेची संहिता ढसाळ यांनी वडाळयाच्या आंबेडकर कॉलेज परिसरात लिहिल्याने त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळपासून तेथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून येथे लोटलेल्या जनसागराने ढसाळ यांना अभिवादन केल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा चैत्यभूमीकडे निघाली. त्या वेळी ‘पँथर हा पक्ष नव्हता ती होती एक चळवळ न्याय हक्काची, प्रत्येक आंबेडकरी तरुणाला आपली वाटणारी. कालही आणि आजही, असे डॉ. आंबेडकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी झळकावलेले फलक ‘पँथर’चा इतिहास मांडत होती. दलित, शोषित, पिडीत कष्टक-यांचा आवाज बुलंद करणा-या महाकवीला शेवटची आदरांजली अर्पण करण्यासाठी आंबेडकर कॉलेज परिसरात सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी लोटली होती.
दुपारी दोन वाजता निघालेली महायात्रा तब्बल तीन तासांनंतर चैत्यभूमीवर दाखल झाली. संपूर्ण शासकीय इतमामात ढसाळ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी बंदुकीच्या तीन फै-या झाडून लढवय्या पँथरला मानवंदना दिली. त्यानंतर ‘बुद्धम् सरणम् गच्छामि’चा, जागर करत जनजासगर पुढे सरकता होता.
ज्येष्ठ कवी गुलजार, ज्येष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी, समाजवादी नेते भाई वैद्य, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदाराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, जांबुवंतराव धोटे, शिवसेना नेते मनोहर जोशी, दिवाकर रावते, महापौर सुनील प्रभू, माजी मंत्री गंगाधर गाडे, नगरसेवक मनोज संसारे आदी मान्यवरांनी नामदेव ढसाळ यांना आदरांजली अर्पण केली. गृहमंत्री आर. आर. पाटील, महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर, आमदार अबू आझमी, भाजपचे मधू चव्हाण यांनी ढसाळ यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
नामदेवा परत ये
नामदेवा परत ये तुझी मुंबई तुझी वाट पाहत आहे
पतिव्रता होण्यासाठी …………………
नामदेवा परत ये एका गोलपिठ्याने कदाचित आमची
संस्कृती बदलणार नाही …………….
नामदेवा परत ये कदाचित उद्याचा सुर्य
राखला असेल तुझ्याचसाठी …………
नामदेवा परत ये कदाचित पुढच्या संमेलनाचे व्यासपीठ
पेलू शकेल तुझे वजन ………………..
नामदेवा परत ये ह्यावेळी म्हातारा मूर्ख नसेल पूर्वी इतका
नामदेवा परत ये आकाशाची एक खिडकी सताड चालू असेल
तुझ्यासाठी …………………………….
नामदेवा परत ये तुझ्या खोपटातील काळोख दिसेल
सर्व जगाला ……………………………
नामदेवा परत ये आपली आय बहिण कधीच विटाळली
जाणार नाही ………………………….
नामदेवा परत ये तुझ्या पापाचे आर्ष काव्य राहिले
आहे लिहायचे ……………………….
नामदेवा परत ये तुझ्यातील बैलाचे बळ कस्टडी
तोडतय आज ………………………
नामदेवा परत ये तुझ्या धारदार तारुण्याला म्यान
करता येईल आता …………………
नामदेवा परत ये आई मेल्याचे दुख तू सहज पचावशील रे
आम्ही नाही रे ………………………..म्हणुन तू परत ये
आमच्या आईचे रूप घेऊन आलेल्या पुरुषा तू परत ये
नामदेवा परत ये…………………..
—- प्रितम ओव्हाळ.