दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारतर्फे एक लाख रुपयांची ‘सुकन्या’ विमा योजना सुरु करण्यात येणार आहे.
मुंबई- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारतर्फे एक लाख रुपयांची ‘सुकन्या’ विमा योजना लवकरच सुरु करण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्रालयातर्फे ही योजना आखली असून शुक्रवारी होणा-या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे एका अधिका-याने पीटीआयशी बोलताना सांगितले.
या योजनेनुसार, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या नावे सरकार २१ हजार २०० रुपये जमा करणार आहे. मुलगी १८ वर्षाची झाली की तिला पुढील शिक्षणासाठी एक लाख रुपये मिळतील, अशी यात तरतूद केली आहे. जानेवारी २०१४ पासून ही योजना लागू होणार आहे. यासाठी महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चाही केली.
दरवर्षी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात दोन लाख मुलींचा जन्म होत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर ५७६ कोटी रुपयांचा अधिक भार पडणार आहे.
बलात्कार आणि अॅसिड हल्ल्यातील पिडीतांनाही सरकारतर्फे आर्थिक मदत देण्याविषयी पुढील कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. यात तीन लाख रुपये त्यांचे औषधपाणी, कायदेविषयक सल्ला आणि पुनर्वसनासाठी दिले जातील, असे या अधिका-याने सांगितले.
योजना छान आहे